कल्याण डोंबिवली महापालिकेतील कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन | पुढारी

कल्याण डोंबिवली महापालिकेतील कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : वेळेत पगार होत नसल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेतील  १५० कंत्राटी कामगारांनी आज (दि.६) काम बंद आंदोलन केले. कामगार कायद्याच्या तरतुदीनुसार कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार लढा संघटनेतर्फे विविध मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या. मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कामगारांनी दिला आहे.

महापालिका क्षेत्रात काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना तीन ते चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. काम करूनही महिन्याला पगार मिळत नसल्याने कामगार हवालदील झाले आहेत. आज सकाळी आर अँड बी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदाराच्या ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांनी काम बंद आंदोलन केले. किमान वेतन कायद्यानुसार वेतन वेळेवर मिळावे, भविष्य निर्वाह निधीची शासकीय रक्कम भरली जावी, कामगारांना गणवेश मिळावा तसेच गुगल आणि फोन पे द्वारे टप्प्याटप्प्याने वेतन अदा करू नये. यासारख्या अनेक मागण्यांसाठी कामगारांनी आंदोलन केले. कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांवर हे कामगार चालक आणि वाहक म्हणून काम करतात. दरम्यान, मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे. दुसरीकडे महापालिका आयुक्तांना या संदर्भात वारंवार तक्रारी केल्या असून आता त्यावर तोडगा काढावा, अशी विनंती कामगारांनी केली आहे. कामगारांच्या आंदोलनामुळे कल्याण डोंबिवली शहरातील कचरा संकलनावर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा : 

Back to top button