

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे आपल्याला सतत तहान लागते. परिणामी जास्त जेवणही जात नाही. अशा वेळी अशक्तपणा जाणवतो. या वेळी तुम्हाला या दिवसांमध्ये उपलब्ध असलेली काही फळे तुमची तब्येत
निरोगी ठेवतील. आता कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली. या दिवसांत आपल्या शरीरास पाण्याची गरजे भासते. शिवाय उष्णतेमुळे भूक मंदावते. जेवण जात नसल्यामुळे आवश्यक प्रोटिन्स आणि कॅल्शिअमची कमतरता भासते. मग डोळ्यासमोर अंधारी येणे, लवकर थकून जायला होते. अशावेळी फळे खाल्ली तर आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कायम राहण्यास मदत होते.
आंबा : उन्हाळ्यात आंबा हे फळ आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानले जाते. कारण भूक वाढवणे हा आंब्याचा मुख्य गुण आहे. पिकलेल्या आंब्याचा रस हा अतिशय मधूर असतो.
कलिंगड : कलिंगड मुळात थंड आणि पाणीदार असल्याने त्याच्या सेवनाने आपली तहान भागते. त्याचे सेवन केल्याने उन्हाचा त्रासही कमी होतो.
खरबूज : यात व्हिटॅमिन अ आणि पोटॅशियमसारखे खनिज पदार्थ आहेत. याचं सेवन केल्याने उन्हाचा त्रास कमी होतो.
जांभूळ : जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. उन्हाळ्यात होणार्या अतिसाराच्या त्रासावर उपाय म्हणून जांभळे खावीत. जांभळातही पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते उन्हाळ्यात उपयुक्त ठरते. ते अनेक रोगांवर गुणकारी आहे.
द्राक्ष : द्राक्षातही पाण्याचे प्रमाण असल्याने ते उन्हाळ्यात अतिशय उपयुक्त फळ ठरते. लहान मुले आणि मोठी माणसे हे फळ हौशेने खातात. द्राक्षांमध्ये मुबलक प्रमाणात ग्लुकोज असते.
आवळा : आवळा हे फळ बहुगुणी आहे. उन्हाळ्यात सतत पित्त होते. त्याच्यावर उपाय म्हणून आवळ्याचं सरबत प्यावे. आवळा आणि खडीसाखर एकत्र करून खाल्ल्याने उन्हाळ्यातील लघवीसंदर्भातील तक्रारी कमी होतात.
स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरी हे फळ लाल रंगाचे असते आणि हे फळ लहान मुलांना खूप आवडत असते. हे फळ रसाळ असून हे फळ चवीला गोडही असते. स्ट्रॉबेरी खाण्यास जितकी खाण्यास चवीला गोड आहे तेव्हढीच आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. स्ट्रॉबेरीमध्ये जीवनसत्वे, फॉलिक अॅसिड आणि कॅल्शियम, फॉस्फरस इत्यादी प्रकारची खनिजे आहेत. हे आरोग्यासाठी आणि आपल्या त्वचेसाठी लाभदायक आहेत.
उन्हाळ्यात कलिंगड, द्राक्ष आणि इतर उन्हाळी फळे अंगातील प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. हलक्या अन्नाबरोबरच पाण्याची गरज भागवणारी फळे खाणे जास्त योग्य ठरते.
– डॉ. वंदना