बारामतीत धोकादायक पद्धतीने उसाची वाहतूक | पुढारी

बारामतीत धोकादायक पद्धतीने उसाची वाहतूक

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील बारामती-निरा, बारामती – फलटण, बारामती- मोरगाव, बारामती – भिगवण आणि बारामती- इंदापूर या राज्यमार्गांवर धोकादायक पद्धतीने उसाची वाहतूक केली जात आहे. वाहतुकीच्या कोणत्याही नियमांचे पालन होत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. सध्या तालुक्यातील सोमेश्वर, माळेगावसह छत्रपती आणि इतर खासगी साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करण्यात येत आहे. बैलगाडी, टूक आणि ट्रॅक्टरमधून उसाची वाहतूक सुरू आहे. मात्र, अनेक वाहनचालक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत.

क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्याने इतर वाहनचालकांची गैरसोय होत आहे. ट्रॅक्टरचालक दोन ते तीन ट्रॉल्या जोडलेली वाहने बर्‍याचदा रस्त्याच्या कडेला उभी करतात, त्यामुळे पाठीमागून येणार्‍या वाहनांना अडथळा निर्माण होतो. तसेच वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. विनाक्रमांकाची वाहने, वाहन चालविण्याचा परवाना नसणे; विमा, रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनातून उसाची वाहतूक होत आहे. धोकादायक पध्दतीने होत असलेल्या वाहतुकीमुळे उसाच्या ट्रॉली उलटल्याच्या घटना घडल्या आहेत.

उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून रस्तासुरक्षा सप्ताहात रिफ्लेक्टर आणि सुरक्षित वाहन चालविणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मात्र, काही वाहनचालक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. मोठ्या आवाजात गाणी ऐकत आणि उसाने भरलेल्या दोन ते तीन ट्रॉल्या ओढण्याची जणू स्पर्धाच या मार्गावर दिसत आहे. मोठ्या शहरांच्या ठिकाणी या वाहनांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असते. या सर्वच मार्गांवर अनेक विद्यालये असल्याने हजारो विद्यार्थी रस्त्यावरून प्रवास करतात. त्यांनाही याचा फटका बसत आहे. ऊस वाहतूक करताना नियमांचे पालन व्हावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

Back to top button