PM Narendra Modi: केंद्र सरकारमुळे देशातील कोट्यवधी रुग्णांची ८० हजार कोटींची बचत-पंतप्रधान | पुढारी

PM Narendra Modi: केंद्र सरकारमुळे देशातील कोट्यवधी रुग्णांची ८० हजार कोटींची बचत-पंतप्रधान

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: देशातील ९ हजार जनऔषधी केंद्रांवर बाजार भावापेक्षाही स्वस्त औषधी उपलब्ध आहेत. गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबियांची त्यामुळे २० हजार कोटींची बचत झाली आहे. ‘आयुष्मान भारत’योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या पाच लाखांपर्यंतचा नि:शुल्क उपचारामुळे देशातील कोट्यवधी रुग्णांची आजारावर खर्च होणाऱ्या जवळपास ८० हजार कोटींची बचत झाली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील रिसर्चवर आयोजित वेबिनारला संबोधित करतांना केले.

‘पीएम आयुष्मान भारत’ योजनेतील आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या माध्यमातून ‘क्रिटिकल हेल्थ इन्फ्रा’ छोट्या शहरापंर्यंत घेवून जाण्यात येत आहेत. छोट्या शहरांमध्ये नवीन रुग्णालयांसह आरोग्य क्षेत्राशी संबंधित एक संपूर्ण ‘इको सिस्टम’ विकसित होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. देशात चांगला तसेच आधुनिक आरोग्य पायाभूत सुविधा असणे अत्यंत आवश्यक आहे. देशात दीड लाख ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’ उभारले जात आहेत.या केंद्रांमध्ये मधुमेह, कर्करोग तसेच हद्याशी संबंधित गंभीर आजरांच्या तपासण्यांची सुविधा उपलब्ध केली जाईल, असे पंतप्रधान म्हणाले.

अशात देशाची परदेशावरील निर्भरता कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. भारतात कुठल्याही आजारावरील उपचार ‘अर्फोडेबरल’ बनवण्यास सरकारने प्राधान्य दिले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. अस्वच्छेतमुळे होणाऱ्या आजारांपासून देशवासियांचा बचाव करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान असो, धुरामुळे होणाऱ्या आजारांपासून बचावासाठी उज्वला योजना असो अथवा दूषित पाण्याच्या आजारापासून बचावासाठी जल जीवन मिशन असो, या सर्व योजनांचे चांगला परिणाम दिसून येत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

कधी कधी संकट स्वत:ला सिद्ध करण्याची संधी घेवून येते. कोरोना काळात भारतील औषध निर्माण क्षेत्राने अभूतपूर्वरित्या संपूर्ण जगाचा विश्वास संपादित केला. याचे आपण भांडवल केले पाहिजे, असे मोदी म्हणाले. ड्रोन टेक्नोलॉजीमुळे औषधांच्या वितरणावर तसेच तपासण्याशी संबंधित लॉजिस्टिक मध्ये एक क्रांतिकारी परिवर्तन दिसून येत आहे. ‘आत्मनिर्भर’बनायचेच आहे या ध्येयाने उद्योजकांनी कुठल्याही तंत्राचे आयात करण्यापासून वाचले पाहिजे.

गेल्या काही वर्षांमध्ये २६० हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आले आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमातील जागांची संख्या २०१४ नंतर आज दुप्पटीने वाढली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांजवळ १५७ नर्सिंग कॉलेज सुरू करणे वैद्यकीय मनुष्यबळात भर घालण्यासाठी टाकण्यात आलेले एक मोठे पावूल असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

Back to top button