शिवसेनेचे माजी मंत्री उत्तम खंदारे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल | पुढारी

शिवसेनेचे माजी मंत्री उत्तम खंदारे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शिवसेनेचे माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्या विरुद्ध पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शासकीय विश्रामगृहात एका महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा खंदारे यांच्यावर आरोप आहे.

या प्रकरणी एका 37 वर्षाच्या महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी उत्तम प्रकाश खंदारे (वय 65, रा. सोलापूर), त्यांचे साथीदार महादेव भोसले, बंडु दशरथ गवळी (रा. सोलापूर) यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बी रेस्ट हाऊस व बिबवेवाडीत 2012 पासून ते आतापर्यंतच्या काळात घडला आहे. अकरा वर्षानंतर महिलेने याप्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.

खंदारे यांनी मुलाचा सांभाळ करतो, असे सांगून लग्नाचे आमिष दाखवत महिलेला चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. तर मुलाच्या संगोपनासाठी दिलेले चेक वटले नाही. तसेच महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. खंदारे हे तत्कालीन शिवसेना भाजप युतीमध्ये सामाजिक न्याय तथा क्रीडा मंत्री होते. तसेच उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून गेले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम खंदारे याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखविले व फिर्यादीचे मुलाचा सांभाळ करतो, असे भासवले. बी रेस्ट हाऊस येथे फिर्यादीला बोलावले. त्यांना चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी यांनी नकार दिला, तरी त्यांनी पट्ट्याने मारहाण करत त्यांच्यावर बलात्कार केला. याच दरम्यान फिर्यादींनी एका मुलाला जन्म दिला आहे.

या मुलाच्या संगोपनासाठी खंदारे यांनी आर्थिक तरतुद म्हणून चेक दिले. परंतु, ते चेक वटले नाही. तेव्हा फिर्यादी यांनी ही बाब त्यांना सांगितल्यावर त्यांनी व इतरांनी फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी आता जीवाच्या भितीने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

फिर्यादी महिला या उत्तम खंदारे यांच्याकडे काम करत होत्या. त्यातून त्यांचा परिचय झाला होता. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर त्यांनी याबाबत बिबेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या चौकशीअंती खंदारे आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

– संगिता जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बिबवेवाडी

Back to top button