डोंबिवलीत रस्त्यांच्या प्रश्नावरून ठाकरे गटाचा शिंदे गटाला पाठिंबा! | पुढारी

डोंबिवलीत रस्त्यांच्या प्रश्नावरून ठाकरे गटाचा शिंदे गटाला पाठिंबा!

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना फूटीनंतर राज्यात ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना शहरातील रस्त्यांच्या प्रश्नांवरून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे समर्थन केल्याने शहरात चर्चेचा विषय बनला आहे. डोंबिवली शहर बकाल करणे हे गेल्या 15 वर्षांपासून आमदार असणाऱ्या भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांचे पाप आहे, असा थेट आरोप ठाकरे गटाचे पदाधिकारी सदानंद थरवळ यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

दोन दिवसांपूर्वी एका खासगी शाळेच्या कार्यक्रमात रस्त्यांसंदर्भात बोलताना आमदार रवींद्र चव्हाण यांनी अप्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्र्यांना टोला लगावला होता. त्यानंतर शिंदे गटाचे माजी नागरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत आमदार चव्हाण यांना लक्ष केले. तुम्ही आमदार असताना नेमके काय केले? असा सवाल त्यांनी केला होता. आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील शिंदे गटाचे या प्रश्नावरून समर्थन करत चव्हाण यांच्यावर आरोप केले आहेत. ठाकरे गटाचे सदानंद थरवळ म्हणाले की, कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 15 वर्षात नेमके काय केले? रस्त्यांची दुर्दशा झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यांसदर्भात आता आरोप करणारे चव्हाण गुवाहाटीला मुख्यमंत्र्यांसोबत होते. तेव्हा यासंदर्भात चर्चा का केली नाही. आता नवीन रस्ते करण्यास सुरुवात कराल तेव्हाच केबल, गॅस वाहिनी, विजवाहिनी यांचे काम करा. पुन्हा रस्ते खोदण्याची वेळ येऊ देवू नका. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना देखील पत्र पाठवले आहे. शहारत गणेशोत्सवात उभारलेल्या कमानी काढल्या नसल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. डोंबिवली शहरात बकालपणा वाढला असून अधिकारी कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button