डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : अनंत चतुर्दशीदिनी कल्याण-डोंबिवलीच्या मधोमध असलेल्या 90 फुटी रोडला कचोरे-खंबाळपाडा परिसरातील भाविक आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडून बाप्पाला निरोप दिला. तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्यावतीने कचोरे आणि खंबाळपाडा परिसरात कृत्रिम तलावाची व्यवस्था करून देखील गणेशभक्तांनी या ठिकाणी मूर्ती विसर्जन करण्याकडे पाठ फिरवल्याचे पहायला मिळाले.
कल्याण पूर्वेतील पत्रीपूल-कचोरे परिसरात कल्याण आणि ठाकुर्लीच्या दरम्यान असलेल्या कचोरे येथील विसर्जन घाटावर जाण्यासाठी रस्ता नाही. या भागात तलाव नसल्यामुळे बाप्पाच्या विसर्जनासाठी नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून गणेश घाटावर जावे लागते. या भागातील ग्रामदेवतेचे मंदिर देखील खाडी किनाऱ्यालगत रेल्वे मार्गाच्या पलीकडे आहे. विसर्जनादिवशी या ठिकाणी स्थानिक सागरदेवी सेवक मंडळ आणि पोलिसांच्या मदतीने गणेशभक्तांनी व्यवस्थितरित्या विसर्जन पार पाडले.
गणेश भक्तांना रेल्वे रूळ ओलांडून खाडी किनारी जावे लागू नये म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्यावतीने कचोरे आणि खंबाळपाडा परिसरात कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली. मात्र या कृत्रिम तलावांकडे पाठ फिरवत गणेशभक्त आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडत खाडी किनारी जाऊन बाप्पाचे विसर्जन केले. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महापालिका प्रशासनासह पोलिसांनी याठिकाणी गणेश भक्तांना सहकार्य केले.
हेही वाचा