कल्याण-डोंबिवलीत १० हजार २५८ गणेश मूर्तींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन | पुढारी

कल्याण-डोंबिवलीत १० हजार २५८ गणेश मूर्तींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर…गणपतीचे चालले गावाला चैन पडेना…उंदीर मामा की जय…असा जयघोष करत ढोल-ताशा-झांज पथकांच्या तालावर खाजगी अर्थात घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाला निरोप दिला. गेले 10 दिवस सार्वजनिक आणि घरी स्थानापन्न झालेल्या गणरायाला शुक्रवारी अनंत चतुर्दशीला निरोप देण्यात आला. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही निर्विघ्नपणे अत्यंत भक्तिमय वातावरणात कल्याण-डोंबिवली परिसरातील 163 सार्वजनिक, तर 10 हजार 95 खासगी अर्थात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन विविध स्थळांवर करण्यात आले.

शुक्रवारी संध्याकाळी घरातून, तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपांतून गणपती निघाले. विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला. अशा पावसातही अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि शांततापूर्ण रीतीने कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागातील गणेश मूर्तींचे विसर्जन सामाजिक, शैक्षणिक, सेवाभावी संस्था यांच्या मदतीने, तसेच महापालिका अधिकारी/कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने पार पडले.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीतल्या भाद्रपद महिन्यातील श्री गणेश मूर्तींचे विसर्जन विविध विसर्जनस्थळांवर करण्यात आले. त्यापैकी विसर्जन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत 404 गणेश मूर्तींचे विसर्जन विविध विसर्जनस्थळांवर करण्यात आले. तर शुक्रवारी संध्याकाळी निघालेल्या मिरवणुकांतील केडीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार 9 हजार 536 गणेश मूर्तींचे शनिवारी पहाटेपर्यंत विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत विसर्जन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत एकूण 3 हजार 244 गणेश मूर्तींचे आणि विविध विसर्जन स्थळांवर 55 हजार 805 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

कल्याणच्या विजय तरूण मंडळाचा 59 वा सार्वजनिक गणेशोत्सव 2022 लक्षवेधी ठरला होता. श्रींच्या विसर्जन मिरवणूकीत स्वातंत्र्यवीरांची स्मरण यात्रा काढण्यात आली होती. हिंदुस्थानच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्षाचे औचित्य साधून स्वातंत्र्य संग्रामात तन-मन-धन अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करून त्यांना मानवंदना देण्याचा या मिरवणुकीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला होता.

महानगरपालिकेने विसर्जनस्थळांवर फायर ब्रिगेड, स्वयंसेवक, रबर बोट, आदी साहित्य सज्ज ठेवले होते. त्याचप्रमाणे विसर्जनस्थळे व विसर्जन मार्गावर 168 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह 2 हजार 455 हॅलोजनची व्यवस्था करण्यात आली होती. गणेशोत्सवादरम्यान प्रकाश व्यवस्थेसाठी विहित क्षमतेचे एकूण 67 जनरेटर, 88 लायटींग टॉवर विद्युत विभागामार्फत बसविण्यात आले होते. विसर्जनस्थळी जमा झालेले एकूण 171 टन निर्माल्य डोंबिवलीतल्या श्री गणेश मंदिर संस्थान, एमआयडीसीतील खत प्रकल्प, आयरे बायोगॅस प्रकल्प, कचोरे बायोगॅस प्रकल्प, उंबर्डे बायोगॅस प्रकल्प येथे देण्यात आले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक निर्माल्य तयार झाले असले तरीही घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्यावरण प्रेमी संस्था यांच्या मदतीने ते स्वतंत्रपणे गोळा करण्यात आले. अशाप्रकारचे निर्माल्य खाडी किंवा नदीमध्ये न टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणात घट झाली आहे. त्यासाठी नागरिकांसह गणेश मंडळांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा

नवी मुंबईत ९ हजार १६९ गणेशमूर्तींचे मोठ्या उत्साहात विसर्जन

नाशिककरांनी वाजत गाजत दिला बाप्पाला निरोप; पाहा फोटो…

बेळगाव : गणपती बाप्पाचे विसर्जन जल्लोषात… 

Back to top button