नवी मुंबईत ९ हजार १६९ गणेशमूर्तींचे मोठ्या उत्साहात विसर्जन | पुढारी

नवी मुंबईत ९ हजार १६९ गणेशमूर्तींचे मोठ्या उत्साहात विसर्जन

नवी मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  नवी मुंबईत शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक ४८८ तर घरगुती ८ हजार ६०८ श्री गणेश मूर्ती आणि ७३ गौरीमूर्ती अशा एकूण ९ हजार १६९ मूर्तींचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात विसर्जन करण्यात आले. नवी मुंबईतील २२ नैसर्गिक व १३४ कृत्रिम विसर्जन स्थळांवर मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

मिरवणुकीत भर पावसातही गणेश भक्ताचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. ओलेचिंब होत भाविक विसर्जन मिरवणुकीत बेभान होवून नाचत होते. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विसर्जन ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, लाईफगार्ड, उपायुक्त, सहायक आयुक्त दर्जाचे देखरेखीवर नजर ठेवून होते. ७०० हून अधिक स्वयंसेवक, लाइफ गार्डस आणि अग्निशमन दलाचे जवान तैनात होते. विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. गणेश भक्तांसाठी पिण्याचे पाणी, याशिवाय विविध सुविधा देण्यात आल्या होत्या. कृत्रिम तलावांच्या ठिकाणी नागरिकांचा मूर्ती विसर्जनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

वाहतूक पोलिसांनी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत अवजड वाहनांना शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली होती. याशिवाय वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहतूक मार्गात बदल करण्यात आले. यात वाशीत कोपरखैरणे, जुहूगावकडून विसर्जनस्थळी जाणाऱ्या मार्गाचा समावेश होता. स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, राज्य राखीव दलाच्या ३ तुकड्या, होमगार्ड असे एकूण सुमारे ३ हजार ७८० कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. विशेषतः पोलीस आयुक्त बिपीनकुमार, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह ५ उपायुक्त, १५ एसीपी, ३० पोलीस निरीक्षक बंदोबस्तावर देखरेख ठेवून होते.

हेही वाचलंत का?

Back to top button