ठाणे : कल्याणमध्‍ये ‘मेळा गणपती’ विसर्जन मोठ्या उत्साहात | पुढारी

ठाणे : कल्याणमध्‍ये 'मेळा गणपती' विसर्जन मोठ्या उत्साहात

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याणमध्ये मेळा गणपतीची परंपरा गेल्या शतकाहून अधिक काळापासून अद्यापही अखंडित सुरू आहे. या मेळा गणपतीचे विसर्जन एकादशीच्या दिवशी मोठ्या भक्तीभावाने करण्याची प्रथा आहे. कल्याणातील मेळ्याच्या 12 गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मिरवणुका ढोल-ताशाच्या गजरात ठरवून दिलेल्या मार्गाने गणेश घाटावर मार्गस्थ होऊन बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. मेळ्याच्या गणपतींसह कल्याण-डोंबिवलीत सार्वजनिक 71, तर 4 हजार 920 गणपतींना मोठ्या भक्तिभावने निरोप दिला जातो.

लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्यानंतर दुसऱ्याच वर्षी कल्याणच्या सुभेदार वाड्यात 1895 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली. त्याकाळी देशप्रेमाने भारलेल्या तरुणांची एवढी मोठी संख्या कल्याणात होती. त्यानंतरच्या काळात वाणी, तेली, चांद्रसेनी कायस्थ प्रभू, खाटीक मंडळी, धनगर, पांचकळशी, गुजराथी, मराठे मंडळी वगैरे मंडळांनी आपापल्या समाजातर्फे हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.

सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मेळ्याच्या स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या या उत्सवाची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेला कल्याण शहरात प्रचंड महत्त्व आहे. गणेशोत्सवात आकर्षक सजावट आणि देखावे करण्यात कल्याणातील मंडळे आणि कार्यकर्ते मागे नसायचे. पण मुंबई, पुण्यातील गणेशोत्सव देखाव्यांचे कौतुक त्यांनाही असे. अर्थात मंडळाचा गणेशोत्सव असल्याने मुंबई, पुण्यातील देखावे पाहण्यासाठी जाणे शक्य नसायचे. अशा स्थितीत काही मंडळांनी एक नामी शक्कल काढली. एकादशीच्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करून उरलेले दोन दिवस मुंबई-पुण्यातील गणेशदर्शनाला निघायचे, अशी परंपराच कल्याणमध्ये सुरू झाली.

भाद्रपद एकादशीच्या दिवशी विसर्जन करणाऱ्या मंडळांच्या गणरायांना मेळ्याचे गणपती असे संबोधले जाऊ लागले. इतरत्र सहसा कुठे न आढळणारी एकादशीच्या विसर्जनाची परंपरा कल्याणमध्ये सुरू आहे. या गणपतींचे विसर्जन एकादशीच्या दिवशी केले जाते. प्रत्येक गणपतीचा मान ठरलेला आहे. मात्र काळाच्या ओघात अनेक मंडळे या मेळ्यातून बाहेर पडली असली तरी आजही 12 मंडळांचा मेळा गणेशोत्सव मंडळात समावेश आहे. हे सर्व गणपती आपापल्या मानाप्रमाणे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. प्रत्येकाचे नंबर ठरवून दिलेले असून त्या नंबरचा गणपती विसर्जनासाठी निघाल्यानंतर त्यापुढील गणपती या रॅलीत सहभागी होत असताे.

अत्रे रंगमंदिराकडून निघडलेल्या या विसर्जन मिरवणुकीत तेली मंडळी, वैश्य समाज मंडळ, धनगर समाज मंडळ, शाहू छत्रपती गणेशोत्सव मंडळ, नवजीवन गणेशोत्सव मंडळ, उदय गणेश मंडळ, बाल गणेश मंडळ, बच्चीराम तेली गणेश मंडळ, कुंभारवाडा गणेश मंडळ, गुजराती समाज मंडळ, हनुमान प्रासादिक गणेशोत्सव मंडळ, गजानन प्रासादिक मंडळ या 12 गणपतींचा समावेश असून या गणपतीच्या मिरवणुका ढोल-ताशाच्या गजरात ठरवून दिलेल्या मार्गाने गणेश घाटावर मार्गस्थ होत होते. शेवटच्या गणपतीचे विसर्जन दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चालते. मेळ्याच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी कल्याणात काढण्यात आलेल्या मिरवणुकींना ढोल-ताशा-झांज पथकांचा साज चढलेला दिसून आला.

हेही वाचा  

Back to top button