शिक्षकांच्या दोन वर्षांनंतर होणाऱ्या बदल्यांची आवश्यकता नाही: चंद्रकांत पाटील | पुढारी

शिक्षकांच्या दोन वर्षांनंतर होणाऱ्या बदल्यांची आवश्यकता नाही: चंद्रकांत पाटील

पुणे, पुढारी वृत्तसेवा: केंद्राने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले आहे. ब्रिटीशांनी देशामध्ये जे शिक्षण आणले ते त्यांच्या स्वार्थासाठी होते. त्यांना राज्य चालवायचे होते. यंत्रणा अशा तयार केल्या की, राज्य वर्षानुवर्षे चालेल. जसे की बदल्या ही संकल्पना ब्रिटीशांची. शासकीय नोकरदाराची नागरिकांशी बांधिलकी तयार होणार नाही, हे त्यांना अभिप्रेत होते. त्यामुळे दर दोन वर्षांनंतर बदल्यांची आवश्यकता नसल्याचे असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

जिल्हा परिषदेकडून बुधवारी (दि.7) उत्कृष्ट शिक्षक व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण प्रसंगी मंत्री ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, भाजपचे माजी गटनेते शरद बुट्टे-पाटील, आशा बुचके आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, दोन वर्षांत बदली होणार आहे, अशी मानसिकता ठेवल्यास नागरिकांशी बांधिलकी निर्माण होत नाही, परंतु नागरिकांशी बांधिलकी होणे गरजेचे आहे. अनेक वर्षे एकाच ठिकाणी राहिल्यावर हितसंबंध तयार होतात, तेही हे धोकादायक आहे. वैद्यकीय व शिक्षण या दोन क्षेत्रांत मिशन म्हणून काम करण्याची गरज आहे. शिक्षकांनी त्याकडे केवळ नोकरी म्हणून पाहता आपले काम म्हणून पाहिल्यास शिक्षणाचा मूळ आत्मा विद्यार्थ्यांमध्ये उतरवू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कामात उत्कृष्टतेचा आग्रह असतो. त्याचप्रमाणे शिक्षकांनीही आग्रह धरावा. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा आत्मा ओतला पाहिजे तरच चांगली पिढी निर्माण होईल. राज्य सरकार शिक्षकांच्या पगारावर दरवर्षी सुमारे 74 हजार कोटी खर्च करते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर काम केले पाहिजे. मेहनत केली पाहिजे. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविण्यासाठी अर्ज करायला नको. हा पुरस्कार आपल्यालाही मिळावा यासाठी असे काम केले पाहिजे.

प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला जिल्ह्यातील गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षक उपस्थित होते.

माजी अध्यक्ष, उपाध्यांची गैरहजेरी…

जिल्ह्यातील उत्कृष्ट शिक्षकांना त्यांच्या कामाबद्दल कौतूकाची थाप देण्यास गतवेळच्या माजी अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पदाधिकार्‍यांपैकी कुणीही या सन्मान सोहळ्याला फिरकले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेत पदाधिकारी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष त्यांच्याच कार्यकाळात काम केलेल्या शिक्षकांच्या कामांचे कौतुक करण्यास गैरहजर राहिले. दुसरीकडे मात्र भाजपचे माजी गटनेत्यांसह काही सदस्य आवर्जुन उपस्थित होते.

Back to top button