अनैसर्गिक अत्याचारप्रकरणी तीन वर्षांचा कारावास, संगमनेर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल | पुढारी

अनैसर्गिक अत्याचारप्रकरणी तीन वर्षांचा कारावास, संगमनेर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: पंधरा वर्षीय मुलासोबत अश्लिल कृत्य करणार्‍या श्री स्टेशनर्स दुकानाचा संचालक राजेश दिगंबर पाठक याला तीन वर्षांचा कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी सुनावली. तालुक्यात राहणारा इयत्ता 10 वीत शिकणारा पंधरा वर्षीय मुलावर 24 मे 2018 रोजी अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात राजू पाठक यांच्या विरोधात पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणाची सुनावणी संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर झाली. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. मच्छिंद्र गवते यांनी जोरदार युक्तिवाद करीत विविध प्रकरणांचे दाखल सादर केले. सरकारी पक्षाच्या वतीने सहा साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. सरकारी पक्षाचे सादर केलेले सबळ पुरावे व सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी राजेश दिगंबर पाठक याला तीन वर्षे सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
चार वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात आरोपीला शिक्षा झाल्याने पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. या खटल्यात सरकारी वकील गवते यांना पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार सुनील सरोदे, पो. हे. कॉ. प्रवीण डावरे, चंद्रकांत जोर्वेकर, एकनाथ खाडे, पो. काँ. सारिका डोंगरे व स्वाती नाईकवाडी यांचे सहकार्य लाभले.

Back to top button