ठाणे; पुढारी वृत्तसेवा: एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यासाठी शिंदे समर्थकांनी दोन वेळा ठाण्यात शक्तिप्रदर्शन करण्याबरोबर शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजीदेखील केली आहे. दुसरीकडे या राजकीय पेचामुळे शिवसेना शाखांवर वर्चस्व कोणाचे असा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता असताना आता शिवसेनेचे सत्ता केंद्र असलेल्या आनंद दिघे यांच्या आश्रमाचा ताबादेखील शिंदे समर्थकांकडेच असल्याचे चित्र दिसत आहे. या आश्रमात सध्या शिंदे समर्थकांचाच मोठ्या प्रमाणात वावर असून आनंद दिघे यांचा आश्रम नेमका कोणाचा? यावर शिवसैनिक काय भूमिका घेणार? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर ठाण्यातही त्याचे पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे. शिंदे यांना मानणारा गटदेखील आम्हीच शिवसैनिक असल्याचे सांगत शिंदे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. त्यानुसार त्यांनी शहरभर बॅनर, पोस्टर लावून त्यांचे समर्थन केले. तसेच शक्तीप्रदर्शनातूनदेखील त्यांनी ताकद दाखवून दिली.
दुसरीकडे आनंद आश्रमजवळ सोमवारी याच शिंदे समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. त्यानंतर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यावर शिवसेनेकडून हकालपट्टीची कारवाई झाल्यानंतर त्यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनादेखील याच आनंद आश्रमजवळ शक्ती प्रदर्शन केले. याच माध्यमातून शिंदे समर्थकांनी आनंद आश्रमचा ताबा घेण्यास सुरवात केल्याचे दिसत होते. परंतु, हा ताबा घेत असताना शिवसैनिकांनी अद्यापही त्याला कोणत्याही स्वरुपाचा विरोध केलेला दिसून आलेला नाही.
दरम्यान शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांचे कार्यालय आणि निवासस्थान असलेले आनंद आश्रम या वास्तूला ठाणे शहरातील शिवसेना पक्षाच्या राजकारणात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. याच आनंद आश्रमातून धर्मवीर आनंद दिघे न्यायनिवाडा करत, या वास्तूतून अनेक महत्वाचे राजकीय डावपेच आखले जात होते. परंतु, त्याची पडझड झाल्यानंतर त्याच्या दुरुस्तीचे काम मागील काही वर्षापासून सुरु आहे. आता हे काम जवळ -जवळ पूर्ण झालेले आहे. आता शिवसेनेत दोन गट झाल्याने आता आनंद आश्रम कोणाचा? असा सवाल उपस्थित झाला आहे. आनंद आश्रम आमचाच म्हणत शिंदे समर्थकांनी या वास्तुचाही आता ताबा घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक याला कसे प्रतिउत्तर देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचलंत का?
आनंद आश्रमाचे काम कसे आहे हे पाहण्यासाठी आम्ही आनंद आश्रमात जमा झालो होतो. यामध्ये ताबा घेण्याचा काही संबंध नाही. आम्ही शिवसेनेतच असल्याने याचा काही प्रश्नच येत नाही.
– संजय मोरे – माजी महापौर, ठाणे