केंद्र सरकारला दिलासा; अंबानींच्या सुरक्षेसंबंधी आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती | पुढारी

केंद्र सरकारला दिलासा; अंबानींच्या सुरक्षेसंबंधी आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी तसेच त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आलेल्या सुरक्षेसंबंधीत दाखल एका जनहित याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला स्थगिती दिली आहे. अंबानी कुटूंबियांच्या सुरक्षेसंबंधी फाईल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सोमवारी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याचिकेवर तात्काळ सुनावणीची मागणी न्यायमूर्ती सूर्यकांत तसेच न्यायमूर्ती जे.बी.पारदीवाला यांच्या अवकाशकालीन खंडपीठासमक्ष केली होती. याचिकाकर्ते बिकाश साहा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी घेतांना उच्च न्यायालयाने मुकेश अंबानी तसेच त्यांची पत्नी आणि मुलांच्या जीवाला धोक्याची शक्यता लक्षात घेता, त्यांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षेसंबंधी गृह मंत्रालयाची मूळ फाईल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

पंरतु, ही याचिका सुनावणी योग्य नाही. महाराष्ट्र सरकारच्या शिफारसीच्या आधारे केंद्र सरकारने अंबानी कुटुंबियांना पुरवलेल्या सुरक्षेशी त्रिपुरा सरकारचा कुठलाही संबंध नाही, असा युक्तीवाद मेहता यांनी केला होता. याच्या साहाय्याने याचिकेवर ३१ मे तसेच २१ जून रोजी उच्च न्यायालयाने दोन अंतरिम आदेश पारित केले होते.

हेही वाचा:

Back to top button