पिंपरी :पाणीटंचाईच्या विरोधात पालिकेवर मोर्चा | पुढारी

पिंपरी :पाणीटंचाईच्या विरोधात पालिकेवर मोर्चा

पिंपरी : पिंपळे निलख, विशालनगर, कस्पटेवस्ती, वाकड या परिसरात गेल्या 4 आठवठ्यांपासून कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाकडून उपाययोजना केल्या जात नसल्याने निष्क्रीय पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. 28) मोर्चा काढण्यात आला.

माजी नगरसेवक तुषार कामठे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पालिका भवन असा मोर्चा काढला. या वेळी पालिका प्रशासनाच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जुलै महिना आला तरी, पालिकेस योग्य प्रमाणात पाणी देता येत नसल्याने रहिवाशांची गैरसोय होत असल्याचे त्रस्त महिलांनी सांगितले.

कामठे म्हणाले, की पिॅपळे निलख, विशालनगर, कस्पटेवस्ती, वाकड परिसरात गेल्या 5 वर्षांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात चार वेळा आंदोलन व उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले. काही प्रमाणात पाणी सुरळीत होतो. मात्र, गेल्या 4 महिन्यांपासून पाणी कमी येत आहे.

कृत्रिम पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. टँकरही पुरविले जात नाहीत. पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. आठवड्याभरात त्यात सुधारणा करून सुरळीत व योग्य दाबाने पाणीपुरवठा न केल्यास पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना वरील परिसरात फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

दोन आठवड्यांत पाणीपुरवठा सुरळीत करणार : आयुक्त
आंदोलनानंतर आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. भामा आसखेड धरणातून 100 एमएलडी पाणी शहरात मिळत आहे. ते काम अंतिम टप्प्यात असून, दोन आठवड्यात ते पाणी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर संपूर्ण शहराला योग्य प्रकारे पाणीपुरवठा केला जाईल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिल्याचे माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी सांगितले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट व पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button