पिंपरी : मतदार यादीवरील आक्षेपांच्या संख्येत मोठी वाढ | पुढारी

पिंपरी : मतदार यादीवरील आक्षेपांच्या संख्येत मोठी वाढ

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांबाबत हरकतींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी (दि. 28) एका दिवसात 550 पेक्षा अधिक हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. आतापर्यंत सुमारे 600 हरकती पालिकेच्या निवडणूक विभागास प्राप्त झाल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 31 मे 2022 पर्यंतच्या मतदार यादी फोडून 1 ते 46 प्रभागात मतदारांची विभागणी करण्यात आली आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 23 जूनला आयुक्त राजेश पाटील यांनी जाहीर केली. यादीतील चुका व मतदारांच्या नावाबाबत शुक्रवार (दि. 1) पर्यंत पालिका सूचना व हरकती स्वीकारत आहे.

आज 550 पेक्षा अधिक हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका व त्रुटी असल्याची ओरड शहरात सुरू झाली आहे. अनेक प्रभागातील नावे गायब झाली आहेत. तर, काही ठिकाणी इतर प्रभागातील नावे प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. विशेष करून माजी नगरसेवक, इच्छुक व राजकीय कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या जात आहेत. त्यांच्याकडून गठ्ठयाने तक्रारी स्वीकारण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

1,200 प्रगणकांना प्रशिक्षण
प्रारूप मतदार यादीबाबत तक्रारींची संख्या वाढत असल्याने महापालिका सतर्क झाली आहे. महापालिकेने सुमारे 1 हजार 200 लिपिक व उपअभियंता यांना प्रगणक (बीएलओ) म्हणून नियुक्त केले होते. त्यांना सोमवारी (दि. 27) प्रशिक्षण देण्यात आले.
आजही त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ज्या कर्मचार्‍यांकडून चुका झाल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची केली जाण्याची
शक्यता आहे.

हरकतींसाठी उरले केवळ तीन दिवस
हरकत घेण्यासाठी कमी मुदत असल्याने माजी नगरसेवक व इच्छुक तब्बल 30 ते 40 हजार मतदारसंख्या असलेल्या प्रारूप मतदारयादी डोळ्यांत तेल घालून तपासत आहेत. आपल्या भागातील व हक्काच्या मतदारांचे नाव आहे किंवा नाही हे तपासले जात आहे. त्यासाठी प्रभागातील जाणकार कार्यकर्ते, अनुभवी व ज्येष्ठ नागरिकांचे सहाय घेण्यात येत आहे. नसलेल्या नावाची यादी तयार करून हरकतीचा अर्ज केला जात आहे. तो कार्यालयात नेऊन दिला जात आहे. हरकत शुक्रवारी (दि. 1) सायंकाळी सहापर्यंत स्वीकारली जाणार आहे. केवळ तीन दिवस शिल्लक राहिल्याने यादी तपासणीस वेग आला आहे.

Back to top button