नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास मुख्यमंत्र्यांची तयारी | पुढारी

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास मुख्यमंत्र्यांची तयारी

ठाणे : दिलीप शिंदे : नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकरी नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आगरी, कोळी स्थानिक भूमिपुत्रांनी मोठे आंदोलन पुकारून शिवसेनेविरोधात भूमिका घेतली आहे. या विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव एकनाथ शिंदे यांच्या मागणीवरून सिडकोने मंजूर केलेला आहे. बाळासाहेबांच्या नावाबाबत मला विचारून ठराव झाला नाही. या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला माझा पाठिंबा असल्याचा शब्द शिवसेना पक्ष प्रमुख ठाकरे यांनी ठाणे, रायगड मधील भूमिपुत्रंच्या बैठकीत दिला असल्याची माहिती माजी आमदार सुभाष भोईर यांनी दिली.

आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष मजबूत करताना ती टिकविण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या बैठका घेऊन नाराज शिवसैनिक, पदाधिकारी याच्याशी संवाद सुरू ठेवला आहे. त्यानुसार, आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठाणे, रायगड जिल्ह्यातील ठराविक पदाधिकारी, आगरी कोळी समाजाचे नेते यांची बैठक घेतली होती.

या बैठकीत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील नाव देण्यास शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून मान्यता असल्याचे सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांचे नावाचा ठराव मंत्रिमंडळात मंजूर केलेला नाही. मला न सांगताच सिडकोत ठराव झालेला आहे. त्यावरून आगरी कोळी समाजात शिंदे यांच्याविरोधात प्रचंड नाराजी पसरलेली आहे. आता ठाकरे यांनी दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा शब्द दिला असून त्यांचे आम्ही ऋणी असू, असे आम्ही सगळ्यांनी ठाकरे यांचे आभार मानले. असे माजी आमदार सुभाष भोईर यांनी सांगितले. भोईर यांचे नाव शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख पदाच्या शर्यतीत आहे.

Back to top button