‘शिष्यवृत्ती’साठी जोरदार तयारी; परीक्षा परिषदेकडून केंद्रांची निश्चिती | पुढारी

‘शिष्यवृत्ती’साठी जोरदार तयारी; परीक्षा परिषदेकडून केंद्रांची निश्चिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी 20 जुलैला महाराष्ट्रात एकाच वेळी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची जोरदार तयारी राज्य परीक्षा परिषदेने केली आहे. त्यासाठी परीक्षा केंद्र निश्चितीचे काम झाले आहे. परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी ‘जिल्हा समन्वयक’, तर गटशिक्षणाधिकारी, वॉर्ड ऑफिसर हे ‘तालुका समन्वयक’ म्हणून काम पाहणार आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेतील काम थंडावले होते. आता मात्र पुन्हा राज्य परीक्षा परिषदेमार्फत विविध परीक्षांचे आयोजन करण्यास सुरूवात झाली आहे.

त्यानुसार 30 जूनपूर्वी विश्वासू, प्रामाणिक, जबाबदार अशा केंद्र संचालकांची नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पाचवी-आठवीसाठी अध्यापन करणार्‍या माध्यमिक शाळांतील शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करावी. मात्र, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिकविणार्‍या शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षेसाठी 31 डिसेंबरपूर्वी सेवानिवृत्त होत नसलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक किंवा पदवीधर शिक्षक यांची केंद्र संचालक म्हणून नियुक्ती करावी.

केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक किंवा पदवीधर शिक्षक उपलब्ध नसल्यासच कार्यक्षम सेवाज्येष्ठ उपशिक्षकाची केंद्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात यावी. एकदा नियुक्त केलेल्या केंद्र संचालकांच्या नावात शक्यतो बदल करण्यात येऊ नये. त्याचबरोबर उपकेंद्र संचालक, पर्यवेक्षक, शिपाई यांची नियुक्ती करण्यासंदर्भातील नियमावली स्पष्ट करण्यात आली आहे. तर, परीक्षेचे गोपनीय साहित्य जिल्हास्तरावर 13 जुलैपर्यंच पोहोच करण्यात येणार आहे. 30 जूनपर्यंत प्रश्नपत्रिका ताब्यात घेणार्‍या अधिकार्‍याचे नाव, पदनाम व दूरध्वनी क्रमांक इत्यादी तपशील परिषदेमार्फत विचारणा झाल्यानंतर कळविण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Back to top button