निम्मी एकपडदा चित्रपटगृहे बंदच | पुढारी

निम्मी एकपडदा चित्रपटगृहे बंदच

पुणे : पुढारी वृत्तसेवा: कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर मल्टिप्लेक्समध्ये चित्रपटगृह हाऊसफुल्ल असताना शहरातील निम्म्याहून अधिक एकपडदा चित्रपटगृहे (सिंगल स्क्रीन) बंदच आहेत. पुण्यातील 35 एक पडदा चित्रपटगृहांपैकी फक्त 5 चित्रपटगृहे सुरू आहेत. तेही मोठे आर्थिक नुकसान सहन करीत आहेत. त्यांचे आठवड्याचे उत्पन्नही फक्त एक लाखापुरतेच उरले आहे. आर्थिक नुकसानीमुळे काही चालकांनी दोन वर्षे बंदच असलेले चित्रपटगृह उघडण्याची जोखीम अजूनही पत्करलेली नाही. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शहरातील एकपडदा चित्रपगृहे बंद होती.

कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतरही बहुतांश चित्रपटगृहे बंदच आहेत. पूना एक्झिबिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सदानंद मोहोळ म्हणाले की, पुण्यात काही एकपडदा चित्रपटगृहे सुरू झालेली नाहीत. कारण, व्यवसायच नसल्यामुळे ते चित्रपटगृहे सुरू करण्यास तयार नाहीत. इतर मनोरंजनाची साधने वाढल्यामुळे आणि चित्रपट व्यवसाय पूर्वीप्रमाणे राहिलेला नसल्यामुळे मग चित्रपटगृहे सुरू करून करायचे काय, हा प्रश्न पडत आहे. पूर्वी असलेला व्यवसाय आज न राहिल्यामुळे अनेक जण हा व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय करण्याची मागणी करीत आहेत. त्याबाबत सरकारकडे दोन वर्षांपूर्वी असोसिएशनने एक पडदा चित्रपटगृहांच्या जागी दुसरा व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. पण, दोन वर्षे उलटली असूनही त्याचे काहीच झालेले नाही. अजूनही चित्रपटगृहचालक त्यावर निर्णयाची वाट पाहत आहेत.

गेल्या दोन वर्षांपेक्षाही अधिक काळ चित्रपटगृहे बंद असूनही वीजबिल, मालमत्ता कर, व्यवस्थापनाचा खर्च, साफसफाई, कर्मचार्‍यांचा खर्च चालकांना करावा लागत आहे. ओटीटी व्यासपीठामुळे तर या व्यवसायाला मोठा फटका बसत असून, प्रेक्षक तर एक पडदा चित्रपटगृहांमध्ये येणेच बंद झाले आहेत. एकपडदा चित्रपटगृहे टिकावीत, यासाठी सरकारने वीजबिल कमी करणे, जीएसटी कमी करण्यात यावा, अशा आमच्या विविध मागण्या आहेत.

                                 – कुणाल मोहोळ, एक पडदा चित्रपटगृहचालक

Back to top button