Thane Municipal Corporation : आरक्षणामुळे राष्ट्रवादी, शिवसेनेच्या दिग्गजांना करावा लागणार संघर्ष | पुढारी

Thane Municipal Corporation : आरक्षणामुळे राष्ट्रवादी, शिवसेनेच्या दिग्गजांना करावा लागणार संघर्ष

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये दिग्गजांना काही प्रमाणात धक्का बसला आहे. यामध्ये माजी महापौर, उपमहापौर तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दिग्गज नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात जागेसाठी संघर्ष करावा लागणार आहे. मात्र, असे असले तरी, प्रभागांची मोडतोड झाल्याने या प्रस्थापित माजी नगरसेवकांना अन्य प्रभागात पर्याय उपलब्ध असल्याने त्यांची चिंता मिटली आहे.

ठाणे महापालिकेची (Thane Municipal Corporation) प्रभाग आरक्षण सोडत मंगळवारी डॉ. काशिनाथ घाणेकर येथे पार पडली. यावेळी माजी महापौर नरेश म्हस्के, स्थायी समितीचे माजी सभापती संजय भोईर, देवराम भोईर, सुहास देसाई, भाजपचे मनोहर डुंबरे आदींसह इतर माजी नगरसेवक उपस्थित होते. प्रभाग आरक्षणात अनेक दिग्गजांना फटका बसेल, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, प्रत्यक्षात आरक्षण सोडतीनंतर उपस्थितांसह अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. काही प्रभाग असे झाले आहेत की त्याठिकाणी प्रस्थापितांना तर संधी मिळणार आहेच, शिवाय त्यांच्या कुटुंबातील इतरांना देखील तिकीट मिळावे, यासाठी संधी उपलब्ध झाली आहे. तर काही ठिकाणी विद्यमान नगरसेवकांना संधी नाही, असे चित्र दिसत असले, तरी प्रभागांची मोडतोड झाल्याने त्यांना इतर प्रभागात संधी उपलब्ध झालेली आहे.

प्रभाग क्रमांक १ मध्ये तीन पैकी दोन वॉर्ड हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या नरेश मणेरा आणि सिध्दार्थ ओवळेकर यांच्यापैकी एकालाच संधी मिळणार आहे. परंतु दुसरीकडे प्रभाग क्रमांक ५ मध्ये मात्र यातील एकाला संधी उपलब्ध होणार आहे. दुसरीकडे प्रभाग क्रमांक १८ मध्ये दोन वॉर्ड महिलांसाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे येथे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला किंवा सुहास देसाई यापैकी एकालाच या ठिकाणी संधी मिळणार आहे. परंतु याठिकाणी महिलांसाठी आरक्षित झालेल्या वॉर्डात दोघांपैकी एक जण आपल्या पत्नीला संधी देऊ शकणार आहेत.

तर प्रभाग क्रमांक २७ मध्ये अनुसुचित जाती, सर्वसाधारण महिला आणि पुरुष असे आरक्षण आल्याने याठिकाणी तत्कालीन महापौर नरेश म्हस्के आणि विकास रेपाळे यांच्यापैकी एकाला संधी मिळणार आहे. त्यामुळे या एका जागेसाठी रेपाळे यांना माजी महापौरांशी समझोता करावा लागणार आहे. परंतु दुसरीकडे प्रभाग क्रमांक २२ मध्ये या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकेल. प्रभाग क्रमांक २९ मध्ये माजी उपमहापौर पल्लवी कदम यांना मात्र धक्का बसल्याचे दिसून आले आहे. हा प्रभाग अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती (महिला) आणि पुरुष असा आरक्षित झाल्याने पल्लवी कदम यांचा पत्ता कट झाला आहे. परंतु त्यांचे पती पवन कदम यांना मात्र संधी मिळू शकणार आहे.

Thane Municipal Corporation : दिव्यात प्रस्थापितांबरोबर नव्याने पक्षात आलेल्यांनाही संधी

दिव्यात शिवसेनेला अपेक्षित असलेले प्रभाग आधीच तयार झालेले आहेत. तर आता आरक्षणातही शिवसेनेच्या बाजूने झुकते माप पडल्याचे दिसून आले आहे. प्रभाग क्रमांक ४३,४४ आणि ४५ मध्ये अपेक्षेनुसार आरक्षण पडले आहे. याठिकाणी माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यासह भाजपमधून शिवसेनेत ढेरेदाखल झालेले आदेश भगत आणि निलेश पाटील यांना देखील संधी मिळणार आहे. परंतु शिवसेनेच्या येथील तत्कालीन नगरसेवकांपैकी आता कोणाला संधी द्यायची, असा पेच शिवसेनेपुढे असणार आहे. या ठिकाणी महिलांसाठी देखील आरक्षण पडले असल्याने त्याठिकाणी तत्कालीन नगरसेवकांच्या पत्नीला संधी द्यावी लागणार आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button