Avinash Bhosale : अविनाश भोसले यांना ८ जूनपर्यंत सीबीआय कोठडी | पुढारी

Avinash Bhosale : अविनाश भोसले यांना ८ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : येस बँक आणि दिवाण हौसिंग फायनान्स लि.च्या (डीएचएफएल ) माध्यमातून करण्यात आलेल्या घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि एबीआयएल ग्रुपचे सर्वेसर्वा अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना अटक केली आहे. दरम्यान, सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांनी भोसले यांना ८ जूनपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश आज (दि.३१) दिले आहेत.

(Avinash Bhosale) डीएचएफएलचे प्रवर्तक असलेल्या कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांच्याशी संगनमताने कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला आहे. याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयासोबतच (ईडी) सीबीआयने गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. सीबीआयने केलेल्या तपासात अविनाश भोसले यांचा गुन्ह्यातील सहभाग समोर आला आहे. त्यानंतर सीबीआयने गुरुवारी रात्री भोसले यांना अटक केली होती.

सीबीआयने भोसले यांना शुक्रवारी दुपारी विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले. यावेळी सीबीआयच्या वतीने सरकारी वकिलांनी भोसले यांच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र, सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकिलांनी रीमांडला विरोध करत एक अर्ज दाखल केला.

न्यायालयाने या अर्जाला उत्तर देण्यासाठी सीबीआयला सोमवारपर्यंतची मुदत देत भोसले यांना सीबीआयच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) विश्रामगृहात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. सीबीआयने भोसले यांचा दावा खोडून काढला. अखेर न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांनी भोसले यांच्यावरील सीबीआय कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा फेटाळून लावत ८ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button