MPSC Result : राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; प्रमोद चौगुले राज्यात प्रथम | पुढारी

MPSC Result : राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; प्रमोद चौगुले राज्यात प्रथम

मुंबई : पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीकडून आज दोन वेगवेगळे निकाल जाहीर केले. आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० चा अंतिम निकाल आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२० ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. (MPSC Result)

आयोगाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ४, ५ व ६ डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२७ चा अंतिम निकाल दिनांक ३१ मे रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण २०० पदावर उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे. या परीक्षेमध्ये प्रमोद बाळासो चौगुले बैठक क्रमांक ( PN005337) हे राज्यातून सर्वसाधारण उमेदवारांमधून, रूपाली गणपत माने बैठक क्रमांक (PN002157) या महिलांमधून तसेच गिरीश विजयकुमार परेकर बैठक क्रमांक (PN002362) हे मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आले आहेत.

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (सीमांकन रेषा) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

प्रस्तुत परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर गुणवत्ता यादीमधील समान गुण धारण करणा-या उमेदवारांबाबत प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीच्यावेळी अस्तित्वात असलेल्या नियमानुसार कार्यवाही करण्यात आली आहे.

प्रस्तुत निकालाद्वारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास, अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्राची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास तसेच शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणा-या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रह करण्यात येईल.

प्रस्तुत परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या व अन्य मुहर्यासंदर्भात विविध न्यायालयात / न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.

प्रस्तुत निकालानुसार दिव्यांग, अनाथ, खेळाडू, मागास इत्यादीसाठी आरक्षित पदावर शिफारसपात्र उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे.

प्रस्तुत निकालाच्या आधारे शिफारस पात्र न ठरलेल्या उमेदवारांना उत्तरपुस्तिका/उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसात आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचनांमधील सूचना क्रमांक ६.४.४ चे कृपया अवलोकन व्हावे.

Back to top button