भंडारा : मुलाचे लग्न लावून दिल्याने बहिणीवर चाकूने वार करुन भावाचे विषप्राशन | पुढारी

भंडारा : मुलाचे लग्न लावून दिल्याने बहिणीवर चाकूने वार करुन भावाचे विषप्राशन

भंडारा ; पुढारी वृत्तसेवा : बहिणीच्या घरी वाढलेल्या मुलाचे लग्न आईवडिलांना विश्वासात न घेता बहिणीने परस्पर उरकून दिल्याच्या कारणावरुन संतप्त भावाने बहिणीच्या पाठीत चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. सदर घटनेची पोलिसांत तक्रार होताच धास्तावलेल्या भावाने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना लाखांदूर तालुक्यातील मांढळ येथे आज (दि.१६) घडली. गोविंदा अर्जुन कांबळे (वय ५५, रा. मांढळ ) असे भावाचे नाव आहे. तर मैना दादाजी चंडीमेश्राम (वय ६०, रा. जुनोना ता. पवनी) असे जखमी झालेल्या बहिणीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गोविंदा कांबळे याचा मुलगा महेश हा गत १४ वर्षापासून बहीण मैना हिच्याकडे राहत होता. दरम्यान महेशचे लग्न मैनाने करुन दिले. एवढेच नाही तर घरदेखील बांधून दिले. मात्र या सर्व कार्यात मैनाने भाऊ गोविंदा व त्याच्या पत्नीला विश्वासात न घेतल्याच्या आरोप गोविंदाचा होता. १५ मे रोजी वास्तूपुजन कार्यक्रमासाठी मांढळ येथे आलेल्या बहीण मैनासोबत गोविंदा व त्याच्या पत्नीने रात्रीच्या सुमारास शिवीगाळ करुन वाद घातला. शिवीगाळ करीत असताना मैनाने हटकले. त्यामुळे संतप्त झालेल्या गोविंदाने बहिणीच्या पाठीत चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. या घटनेची पोलिसांत तक्रार होताच पोलीस कारवाईपूर्वीच धास्तावलेल्या गोविंदाने आज सकाळी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. गोविंदाला उपचारार्थ लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भाऊ गोविंदा व त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार दिलीप भोयर व पोलीस अंमलदार अनिल राठोड करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button