डोंबिवली : मनसेच्या गोटात शिवसेनेचा ‘भोंगा’ ! तीन माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा सेनेत प्रवेश | पुढारी

डोंबिवली : मनसेच्या गोटात शिवसेनेचा 'भोंगा' ! तीन माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा सेनेत प्रवेश

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कोरोना आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे महापालिका क्षेत्रातील निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रातील घडामोडींना वेग आला आहे.

डोंबिवलीतील मनसेचे ३ माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज (शुक्रवार) शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात पक्षाला खिंडार पडल्याने मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.

यावेळी माजी नगरसेविका पूजा पाटील, मनसे तालुका प्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य गजानन पाटील, माजी नगरसेवक तथा जिल्हा सचिव प्रकाश माने, डोंबिवली शहर संघटक संजीव ताम्हाणे तसेच पदाधिकारी सुभाष पाटील, अण्णा पांडे, निशांत पाटील, भास्कर गांगुर्डे, विठ्ठल शिंदे, विद्यार्थी सेनेचे प्रवीण परदेशी आणि संदीप मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, शिवसेनेकडून दबावाचे राजकारण सुरू असून अनेक नगरसेवकांना धमकी दिली जात आहे. त्यांच्यावर दबाव टाकून पक्ष प्रवेश करण्यास भाग पाडले जात असल्याचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे. २०१५ च्या निवडणुकीत मनसेचे एकूण ९ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर पालिकेत मनसेचे विरोधी पक्ष नेता पद भूषविणारे मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता पुन्हा मनसेच्या तीन माजी नगरसेवकांनी प्रवेश केल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button