Putin Apologises : अखेर पुतीन झुकले, ‘त्या’ वक्तव्याबद्दल इस्रायलची मागितली माफी | पुढारी

Putin Apologises : अखेर पुतीन झुकले, ‘त्या’ वक्तव्याबद्दल इस्रायलची मागितली माफी

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी जर्मन हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरला ज्यू म्हटले होते, ज्यावर इस्रायलने तीव्र आक्षेप घेतला होता. आता इस्रायल सरकारने एक निवेदन जारी करून पुतिन यांनी त्या वक्तव्याबद्दल माफी मागितल्याचे जाहीर केले आहे. (Vladimir Putin apologises israel)

गुरुवारी रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी फोनवर चर्चा केली. या संभाषणानंतर, बेनेट यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केले. त्या निवेदनात म्हटले आहे की, इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांनी लावरोव्ह यांच्या वक्तव्याबद्दल रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची माफी स्वीकारली आहे. पुतीन यांनी ज्यू लोक आणि होलोकॉस्टबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. (Vladimir Putin apologises israel)

मात्र, दोन्ही नेत्यांमधील या संभाषणानंतर रशियाने जारी केलेल्या निवेदनात माफी मागण्याचा कोणताही उल्लेख नाही. त्याऐवजी रशियाने दुसऱ्या महायुद्धात कसा हिटलरच्या नाझी सैन्याचा पराभव केला, यावर भर देण्यात आला आहे. वास्तविक, रशियामध्ये 9 मे हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो, जो दुसऱ्या महायुद्धातील नाझींच्या पराभवाचे स्मरण करतो. (Vladimir Putin apologises israel)

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायली पंतप्रधान बेनेट यांनी महत्त्वाची भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला. रशिया-युक्रेन या दोन्ही देशांदरम्यान ते मध्यस्थी करण्यासाठी सरसावल्याचे बोलले जाते. मात्र रशियाचे परराष्ट्र मंत्री लॅव्हरोव्ह यांनी होलोकॉस्ट आणि हिटलरवरून वादग्रस्त वक्तव्य केले. यानंतर बेनेट यांच्या मध्यस्थाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

रशियाचे परराष्ट्र मंत्री लॅव्हरोव्ह यांनी इटालियन वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. युक्रेवरील हल्ल्यावरून त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटले की, ‘युक्रेनला नाझीवादापासून मुक्त करण्यासाठी हा हल्ला केला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे ज्यू असले तरीही युक्रेनमध्ये अजूनही नाझीवाद शिल्लक आहे. हिटलरही मूळचा ज्यू होता. ज्यू लोकांचे सर्वात मोठे विरोधक जू च होते असे मी अनेक वेळा ज्यू लोकांकडूनच ऐकले आहे.’

लॅव्हरोव्ह यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात गदारोळ माजला. इस्रायल ही भडकला. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री यायर लॅपिड यांनी लॅव्हरोव्ह यांचे विधान अक्षम्य, अपमानास्पद आणि ऐतिहासिक चूक असल्याचे म्हटले.

स्वत:ला होलोकॉस्ट मधून बचावलेल्याचा मुलगा म्हणवत लॅपिड म्हणाले, ज्यू लोकांनी होलोकॉस्टमध्ये स्वतःची हत्या केली नाही. ज्यूंच्या विरोधात वंशवादाची ही सर्वात खालची पातळी आहे की त्यांना त्यांच्या स्वत: च्या छळासाठी जबाबदार धरले जात आहे. रशियाने माफी मागावी अशी लॅपिड यांनी मागणी केली होती, तसेच त्यांनी रशियन राजदूताला बोलावून खडे बोल सुनावले होते.

पुतिन यांनी युक्रेनमधील युद्धाला नाझींविरुद्धचे युद्ध म्हटले आहे. तथापि, युक्रेनमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार आहे आणि अध्यक्ष स्वतः ज्यू आहेत, ज्यांचे नातेवाईका होलोकॉस्टमध्ये मरण पावले आहेत.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान, नाझी सैन्य आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी जवळपास 60 लाख ज्यूंची हत्या केली होती. होलोकॉस्टच्या पार्श्वभूमीवर इस्रायलला स्वातंत्र्य मिळाले आणि जगभरातील ज्यूंनी येथे आश्रय घेतला. त्यांनी होलोकॉस्ट आणि त्याच्याशी संबंधित स्मृतींनी आपली ओळख बनवले आहे. गेल्या आठवड्यात इस्रायलने वार्षिक होलोकॉस्ट मेमोरियल डे साजरा केला आहे.

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवरही इस्रायलने रशियाशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण रशियाने इस्रायलचा सीरियात मोठी लष्करी तुकडी तैनात केली आहे. तर एकाबाजूला इस्रायल इराणच्या संशयित लष्करी तळांवर हल्ले करत आहे. इस्रायल आणि रशिया सीरियातील कारवायांवर एकमेकांना सहकार्य करत आले आहेत.

बेनेटच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी आणि पुतिन यांनी दक्षिण युक्रेनियन शहर मारियुपोल येथील स्टील प्लांटमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या योजनांवर चर्चा केली. बेनेट आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात बुधवारी झालेल्या चर्चेनंतर हे पाऊल घेण्यात आले.

Back to top button