ठाणे : प्रतिकात्मक हनुमान घरोघरी वाटतोय हनुमान चालीसा | पुढारी

ठाणे : प्रतिकात्मक हनुमान घरोघरी वाटतोय हनुमान चालीसा

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या औरंगाबादच्या सभेत मशिदीसमोर ४ मे नंतर हनुमान चालीसा पठणाचा इशारा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाण्यात मनसेच्या जनहित आणि विधी विभागाच्या वतीने घराघरात जाऊन तसेच मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे हनुमानाची वेषभूशा करत प्रतिकात्मक हनुमान हनुमान चालीसाचे वाटप करत असून ठाण्यात तब्बल १० हजार हनुमान चालीसा वाटण्यात येणार आहेत, अशी माहिती या विभागाचे अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी दिली.

एकीकडे भोंगा व हनुमान चालीसावरून संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापत असताना ठाण्यातील प्रत्येक हिंदू धर्माभिमानी नागरिकांना हनुमान चालीसा उपलब्ध होण्यात कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी ठाण्यात मनसेच्या वतीने सर्व मंदिरात तसेच घरोघरी जाऊन हनुमान चालीसा पुस्तिकेचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ठाणे शहरात तब्बल १० हजार हनुमान चालीसा पुस्तिकेचे वाटप करण्यात येणार असून भविष्यात नागरिकांच्या मागणीप्रमाणे हनुमान चालीसा पुस्तिकेचे वाटप केले जाणार आहे.

विशेष म्हणजे प्रतिकात्मक हनुमानाच्या रूपातील व्यक्ती या हनुमान चालीसा पुस्तकांचे वाटप शहरात करत आहे. राज ठाकरे यांच्या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी या उपक्रमाचा शुभारंभ ठाण्यातील वसंत विहार येथे असलेल्या हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घेऊन करण्यात आला. सदर उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हनुमान चालीसा पोहोचवण्यात येईल, असा निर्धार स्वप्निल महिंद्रकर यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button