नवाब मलिक यांची प्रकृती अत्यंत गंभीर; स्ट्रेचरवरून जेजे रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल | पुढारी

नवाब मलिक यांची प्रकृती अत्यंत गंभीर; स्ट्रेचरवरून जेजे रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या मंत्री नवाब मलिक यांची प्रकृत्ती अत्यंत असून त्यांना स्ट्रेचरवरून जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ते सध्या आर्थर रोड जेलमध्ये बंदिस्त आहेत. तेथून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली असल्याने मानवतावादी आधारावर अंतरिम वैद्यकीय जामीनासाठी मागणी करणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे. मात्र, त्यांच्या जामीनाला विरोध करणार असल्याचे ईडीच्या वकीलांनी म्हटले आहे. त्यांच्या प्रकृतीची माहिती अगोदर का देण्यात आली नाही, अशी विचारणा त्यांनी केली आहे.

नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा नाहीच

मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या अटकेला आव्हान देणारी महाराष्ट्र मंत्रिमंडळातले मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा फेटाळून लावली आहे. ही केस प्रारंभिक टप्प्यावर असून त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

मलिक यांचा अंतरिम जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. ईडीने मलिक यांना कायद्यानुसार अटक केली असून नियमानुसार त्यांची कोठडी घेतली आहे. अशा स्थितीत त्यांना तत्काळ जामीन देता येणार नाही, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी केली होती.

गेल्या २३ फेब्रुवारी रोजी ईडीच्या पथकाने नवाब मलिक यांची दीर्घकाळ चौकशी केली होती. त्या चौकशीअंती ईडीकडून मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती.

मलिक यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई कायद्यानुसारच असल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने ईडी कारवाईविरोधातील मलिकांची याचिका फेटाळली होती. तसेच अटक बेकायदेशीर असल्याचा नवाब मलिकांचा दावा चुकीचा असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले होते.

ईडीकडून ८ मालमत्ता जप्त

नवाब मलिक यांच्या ८ मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत. यात मलिकांची उस्मानाबाद येथील १४७ एकर शेतजमीन, वांद्रे पश्चिममधील दोन फ्लॅट्स, कुर्ला पश्चिममधील ३ फ्लॅट्स, कुर्ला पश्चिममधील कमर्शियल युनिट आणि गोवावाला कपाउंडमधील मालमत्तेचा समावेश आहे. मेसर्स सोडियस इन्वेस्टमेंट प्रा. लि. आणि मेसर्स मलिक इन्फ्रास्ट्रक्चर या मलिकांच्या मालमत्तांवरदेखील ईडीने टाच आणली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा २०० अंतर्गत नवाब मलिक यांच्या मालकीची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button