नाशिक : गोरक्षकांनी पाठलाग करून गायींची वाहतूक करणारा ट्रक रोखला | पुढारी

नाशिक : गोरक्षकांनी पाठलाग करून गायींची वाहतूक करणारा ट्रक रोखला

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा : नंदुरबारहून ट्रकमधून कत्तलीसाठी होणारी गायींची तस्करी गोरक्षकांनी मोठ्या हिमतीने रोखली. ट्रकमधून  २३ गायी नेल्या जात होत्या. याबाबतची माहिती जैतानेतील गोशाळेचे अध्यक्ष बाजीराव पगारे यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर गोरक्षकांसह पोलिसांनी पाठलाग करून ट्रक थांबवून कत्तलखान्यात नेणाऱ्या गायींना जीवदान दिले. त्यानंतर या गायींना गोशाळेत नेण्या त आले. तर वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकासह गुरे मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबारहून एम.एच.१८ बी.जी ८४१६ या ट्रकमधून कत्तलीसाठी गायीची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने गोरक्षक ऋषभ जैन, घनशाम भंडारी, पुष्पक परदेशी, रोशन परदेशी, प्रणिल मंडलिक, बाजीराव पगारे, प्रविण वाणी यांनी महामार्गावर पाळत ठेवली. त्यांच्यासोबत निजामपूर पोलीस ठाण्याचे पीएसआय सुनिल वसावे, हेड कॉन्स्टेबल जयराज शिंदे, पोलीस नाईक पंकज चौधरी दबा धरुन बसले होते.आज सकाळी ९ च्या सुमारास ट्रक निजामपूरहून निघताच गोरक्षक आणि पोलिसांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. गोरक्षकांनी शेवाळी-दातर्ती दरम्यान तीन वेळा ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वेग वाढवत ट्रक अडविणाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. अखेर शेवाळी-दातर्तीजवळ ट्रक थांबविण्यात गोरक्षक व पोलिसांना यश आले. मात्र चालक वाहन सोडून पसार झाला. तर सहचालक इम्रान खान अलीयार खान (रा. मालेगाव) याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी गोरक्षकांच्या उपस्थितीत ट्रकची तपासणी केली. यावेळी २३ गायी आढळून आल्या. ट्रकसह गायी पोलिसांनी जप्त केल्या. ताब्यात घेतलेल्या गायी नेर येथील गोशाळेत पाठविण्यात आल्या. गोरक्षक बाजीराव पगारे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकासह सहचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पंकज चौधरी करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button