भंडारा : तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा खून | पुढारी

भंडारा : तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा खून

भंडारा : पुढारी वृत्तसेवा : कोका अभयारण्याच्या नवेगाव परिसरात एका महिलेचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी आढळून आला होता. या महिलेचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालावरुन उघडकीस आले आहे. ही महिला कपडे धुण्यासाठी तलावावर गेली असता तिचा खून कोणी केला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

बबिता रत्नघोष तिरपुडे (४५) रानवेगाव असे मृत महिलेचे नाव आहे. कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफरझोन परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास तिचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. तिच्या डोक्यालाही मार लागलेला होता. विशेष म्हणजे ती तलावावर कपडे धुण्यासाठी गेली होती, परत येताना ही घटना घडली. दरम्यान, कारधा पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भंडारा येथे पाठविला. तिचा खून झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. मात्र, तिचा खून कुणी आणि कशासाठी केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारधाचे ठाणेदार राजकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिसाळे तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button