ठाणे : दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, १ लाख २२ हजार विद्यार्थी देणार परीक्षा | पुढारी

ठाणे : दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, १ लाख २२ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

ठाणे : पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आजपासून ( दि. १५)   सुरुवात होत आहे. परीक्षेसाठी बोर्डाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, यंदा दहावीची परीक्षा ऑफलाईन घेतली जात आहे.

ठाणे जिल्ह्यात ३३९ मुख्य केंद्र आणि ८४० उपकेंद्र अशा १ हजार १७९ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातील १ लाख २२ हजार २६९ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार असून, कॉपीमुक्त परीक्षेसाठी ५ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळूनच परीक्षा घेतली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

कोरोनामुळे मागील वर्षी दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाद्वारे गुण देण्यात आले होते. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शाळा – महाविद्यालयेही नियमित सुरू झाली आहेत. त्यामुळे दहावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जात आहे. आज, मंगळवारी दहावीचा पहिला पेपर होणार असून ४ एप्रिलपर्यंत दहावीची परीक्षा सुरू राहणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करूनच परीक्षा घेण्यात येणार आहे.

यंदा ‘शाळा तिथे परिक्षा केंद्र’ या धोरणाप्रमाणे परीक्षा घेतल्या जात असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांमध्ये चौपट वाढ करण्यात आली आहे. दहावीची परीक्षा ३३९ मुख्य केंद्र आणि ८४० उपकेंद्र अशा १ हजार १७९ केंद्रांवर घेण्यात येणार आहे. तर जिल्ह्यात २० परिरक्षक केंद्र असणार आहेत.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी पाच भरारी पथके तैनात

दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्ह्यात ५ भरारी पथके तैनात करण्यात आलेली असून, परीक्षा केंद्रांवर पथकांचे विशेष लक्ष असणार आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी पथक, बैठे पथक, प्राथमिक शिक्षणाधिकारी पथक, विशेष महिला पथक आणि उपशिक्षणाधिकारी पथक ही पथके परीक्षा केंद्रांना भेटी देऊन गैरप्रकार रोखणार आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button