नाशिक शहरात दिवसाआड एकाचा अपघाती मृत्यू | पुढारी

नाशिक शहरात दिवसाआड एकाचा अपघाती मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात चालू वर्षात सरासरी दिवसाआड एकाचा अपघाती मृत्यू होत आहे. 1 जानेवारी ते 13 मार्च या 71 दिवसांच्या कालावधीत 31 पुरुष व पाच महिला अशा एकूण 36 जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये आहे. याच कालावधीत एकूण 98 अपघात झाले असून, त्यात 70 पुरुष व 23 महिला जखमी झाल्या आहेत. मृतांमध्ये सर्वाधिक दुचाकीस्वारांचा समावेश आहे.

वाढत्या शहरीकरणासोबत वाहनांची संख्याही वाढली व रस्ते प्रशस्त झाले आहेत. वाहनांचा वेग वाढला असून, त्यामुळे अपघातांचा धोकाही वाढला. अनेक वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने अपघात होत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव घटल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आल्याने नागरिकांनी वाहनांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे वर्दळीच्या मार्गांवर वाहतूक कोंडी झालेली पाहावयास मिळत आहे. त्यातच वाहतूक नियमांचे पालन न करणार्‍या चालकांकडून अपघात होत असल्याने जीवितहानी व जखमी होण्याचे प्रकार घडत आहे.

1 जानेवारी ते 13 मार्च या कालावधीत शहरात 98 अपघात झाल्याची नोंद पोलिस ठाण्यांमध्ये आहे. त्यामध्ये 36 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यात पाच पादचारी व एक सायकलस्वाराचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सर्वाधिक दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अनेक अपघातांची नोंद पोलिस ठाण्यांमध्ये होत नसल्याने अपघातांची संख्या प्रत्यक्षात 100 हून अधिक असल्याचे बोलले जाते. अनेकदा अपघातास कारणीभूत असलेले चालक वाहनासह फरार होत आहेत. त्यामुळे त्यांचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. यातील अनेक वाहनचालकांचा शोध लागत नसल्याचेही समोर आले आहे.

हेल्मेट, सीटबेल्टकडे दुर्लक्ष
शहरात दरवर्षी हजारो बेशिस्त चालकांकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला जातो. तरीदेखील वाहतुकीला शिस्त लागत नसल्याचे दिसते. चालकांकडून सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे असलेले हेल्मेट, सीटबेल्टचा वापर होत नाही. त्यामुळेदेखील अनेकांचे मृत्यू झाले आहेत. अपघातांना सर्वाधिक कारणीभूत वाहनांचा वेग ठरलेला आहे.

हेही वाचा :

Back to top button