नाशिक : जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांची निरोपाची तयारी सुरू | पुढारी

नाशिक : जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांची निरोपाची तयारी सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा व पदाधिकार्‍यांचा कालावधी 20 मार्चला संपत असून, त्या आधी दोन दिवस सरकारी सुट्या आहेत. त्यामुळे प्रशासक कारकीर्दीपूर्वी सभापतींची दालने, त्यांचे स्वीयसहायक, परिचर यांना त्यांच्या मूळ पदावर स्थापित करण्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे आता प्रत्यक्षात सदस्य व सभापतींना कामकाजाचे केवळ तीन दिवस उरले आहेत.

जिल्हा परिषद सदस्यांचा कालावधी 20 मार्चला संपत असून, त्या आधी 18 मार्चला धूलिवंदन तसेच 19 व 20 मार्चला शनिवार, रविवारच्या सुट्यांमुळे कार्यालय बंद असणार आहे. यामुळे सभापती, अध्यक्ष यांच्याकडील वाहनांचे हस्तांतरण करणे, कार्यालयांमधील कागदपत्र, फायली यांचे हस्तांतरण करणे तसेच त्यांच्या कार्यालयातील स्वीयसहायक, परिचर यांची मूळ पदावर स्थापना करण्याची प्रक्रिया गुरुवारी (दि.17) पर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. यामुळे सामान्य प्रशासन विभागाने याबाबत बैठक घेऊन संबंधितांना याबाबत सूचना दिल्याचे समजते. त्यानुसार सभापती, अध्यक्ष यांच्या दालनातील कर्मचार्‍यांकडून आवराआवर सुरू झाली आहे.

गर्दी वाढली :

सध्या मार्च सुरू असल्यामुळे देयके काढणे, कार्यारंभ आदेश मिळवणे यासाठी ठेकेदारांची जिल्हा परिषदेत गर्दी वाढली असून सदस्यही प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी जि.प.त येत आहेत. त्यामुळे जि.प. प्रांगणामध्ये वाहनांची गर्दी वाढली आहे.

हेही वाचा :

Back to top button