डोंबिवली : दोघा भावांचा खात्‍मा करणाऱ्याला दुहेरी जन्मठेप | पुढारी

डोंबिवली : दोघा भावांचा खात्‍मा करणाऱ्याला दुहेरी जन्मठेप

डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा : कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोडवर असलेल्या रामदास वाडीत राहणाऱ्या तिघा भावांवर 3 डिसेंबर 2010 च्या रात्री सशस्त्र हल्ला करून त्यातील दोन भावांची हत्‍या करण्यात आली. यातील तिसऱ्या भावाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या माथेफिरू खुन्याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी दुहेरी जन्मठेप आणि दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

या हल्लेखोरांमधील मनोज शंकर खांडगे (वय 37, रा. रामदास वाडी, कल्याण) याचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. तर संजय नामदेव पाटील (48, रा. रामदासवाडी, कल्याण) याला न्यायालयाने दोन भावांच्या खूना प्रकरणी दुहेरी जन्मठेप आणि एका भावाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. शिक्षा भोगत असताना आरोपी संजय कोणत्याही माफीसाठी पात्र असणार नाही, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. दुहेरी जन्मठेप आणि सश्रम कारावास या तिन्ही शिक्षा आरोपी संजय पाटील याने एकाच वेळी भोगायच्या आहेत.

या खटल्यात सरकारी वकील म्हणून अश्विनी भामरे-पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पोलिस आणि न्यायालय समन्वयक म्हणून दीपक पिंगट, शशिकांत गांगुर्डे यांनी काम पाहिले. महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी न्यायालयीन साक्षी पुराव्यासाठी या प्रकरणातील सबळ दस्तऐवज न्यायालयात सादर केले.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 3 डिसेंबर 2010 रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास या प्रकरणातील फिर्यादी रामदास यशवंत देवकर (वय 42, रा. रामदासवाडी, कल्याण) त्यांचे भाऊ अशोक यशवंत देवकर (40) कृष्णा यशवंत देवकर (32) असे तिघेजण रात्रीचे जेवण करून त्यांच्या घराबाहेर गप्पा मारत बसले होते. अचानक तेथे संजय नामदेव पाटील, (38) आणि मनोज शंकर खांडगे (37) हे दोघे एम एच 05/ डब्ल्यु 9359 क्रमांकाच्या स्प्लेंडर दुचाकीवरून तेथे आले.

देवकर बंधूंशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून संजय पाटील याने धारदार चाकूच्या साह्याने फिर्यादी रामदास देवकर यांचा भाऊ अशोक देवकर आणि कृष्णा देवकर यांच्या गळा, छाती आणि पोटावर सपासप वार करून गंभीर त्‍यांना दुखापत करून त्यांचा जागीच खात्मा केला. त्यानंतर प्रतिबंध करणाऱ्या रामदास देवकर यांच्याही हात आणि पोटावर वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात रामदास देवकर यांनी 4 डिसेंबर 2010 रोजी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी त्याच दिवशी संजय पाटील आणि मनोज खांडगे यांना अटक केली होती. तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण बानकर, पोनि आर. एम. आव्हाड यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपींच्या विरोधात सबळ व भक्कम पुराव्याअंती कल्याण सत्र न्यायालय कल्याण येथे दोषारोप पत्र दाखल केले.

न्यायालयात सुनावणी सुरू असताना दरम्यानच्या कालावधीत यातील हल्लेखोर मनोज खांडगे मरण पावला. या गुन्ह्यात न्यायालयाने फिर्यादी, पंच, साक्षीदार यांच्या साक्षी नोंदवून परिस्थीतीजन्य व वस्तुस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपी संजय पाटील याला दोन्ही भावांचा खून केल्याच्या आरोपाखाली व फिर्यादी रामदास देवकर यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले.

अशोक व कृष्णा देवकर या दोन भावांच्या खून प्रकरणात न्यायालयाने संजय पाटील या खून्याला प्रत्येक गुन्ह्यासाठी जन्मठेप आणि 20 हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

तर फिर्यादी रामदास देवकर यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 वर्षे सश्रम कारावास 10 हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास 6 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सर्व शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागतील आणि आरोपी कारावासाच्या कालावधीत कोणत्याही माफीसाठी पात्र राहणार नाही, असा निकाल जिल्हा न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी दिला. या खटल्यामध्ये सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. अश्वीनी भामरे-पाटील यांनी युक्तीवाद केला.

Back to top button