Congress and TMC : काँगेस पक्ष ममतादीदींच्या ‘तृणमूल’मध्ये विलीन होणार? | पुढारी

Congress and TMC : काँगेस पक्ष ममतादीदींच्या ‘तृणमूल’मध्ये विलीन होणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : Congress and TMC : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर आता प्रादेशिक पक्षांनीही काँग्रेस पक्षावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. ४ राज्यांमध्ये भाजपच्या दणदणीत विजयानंतर तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाच्या एका नेत्याने चक्क काँग्रेसला टीएमसी (TMC)मध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे, टीएमसी नेत्याकडून असे विधाने आल्यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी संतापले आहेत. त्यांनी टीएमसी आणि भाजपमध्ये हातमिळवणी असल्याचा आरोप केला असून टीएमसी भाजपचा एजंट असल्याची टीका केली आहे.

तृणमूल काँग्रेसचे नेते आणि पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील मंत्री फरहाद हकीम यांनी राष्ट्रीय काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेससारख्या जुन्या पक्षाला पाच राज्यांच्या निवडणुकीत दारुण पराभवाला कसे काय सामोरे जावे लागते, हे मला समजत नाही. एकेकाळी मी सुद्धा या पक्षाचा भाग होतो. सततच्या पराभवानंतर काँग्रेस आता स्वत:च्या पायावर उभी राहून भाजपशी स्पर्धा करू शकत नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसने तृणमूल काँग्रेसमध्ये सामील व्हावे. काँग्रेसचे टीएमसीमध्ये विलीनीकरण करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यांचे ‘तृणमूल’मध्ये विलीनीकरण झाल्यास राष्ट्रीय पातळीवर महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्या तत्त्वांचे अनुकरण करून आपण गोडसेंच्या तत्त्वांविरुद्ध लढू शकतो. (Congress and TMC)

टीएमसीच्या प्रस्तावावर अधीर रंजन चौधरी संतापले…

बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी टीएमसीच्या या प्रस्तावावर संतापले आहेत. टीएमसी हे भाजपचे सर्वात मोठे एजंट असल्याची टीका चौधरी यांनी केली आहे. याउलट त्यांनी टीएमसीला सल्ला दिला आहे की, जर ते भाजपविरोधात लढण्यास गंभीर असतील तर त्यांनीच काँग्रेसमध्ये विलीन व्हावे. (Congress and TMC)

भाजपचा हल्लाबोल; विरोधकांचा चेहरा कोण, ममता की केजरीवाल

दरम्यान, बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी पुढच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदासाठी चेहरा असतील, असा टोला लगावला. गुरुवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे की पश्चिम बंगाल राज्याच्या बाहेर इतर राज्यांत टीएमसीचे अस्तित्व नाही. दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांचा पक्ष पंजाबमध्येच सरकार स्थापन करणार आहे. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी चेहरा कोण असेल, ममता बॅनर्जी की अरविंद केजरीवाल हे त्यांनीच ठरवावे?’, असेही त्यांनी सांगितले. (Congress and TMC)

 

 

Back to top button