मुंबई; पुढारी ऑनलाईन : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची सेक्रेटरी दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणी नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी राणे यांची मुंबईतील मालवाणी पोलिसांनी चौकशी तब्बल ९ तास चौकशी केली. यांनतर नारायण राणे म्हणाले की, मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला. आम्हाला सोडण्यात आल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मुंबई पोलिसांनी राणे यांनी खोटा दावा केला असल्याचे न्यायालयात सांगितले आहे.
मालवाणी पोलीस ठाण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे मागच्या आठवड्यात चौकशीसाठी हजर झाले. दिशा सालियान मृत्यूबाबत चुकीचे विधान करत बदनामी केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांना समन्स बजावण्यात आले होते.
राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्यात त्यांनी दिशाच्या मृत्यूची खोटी माहिती पसरवल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेला गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला आहे. तसेच सिंधुदुर्ग न्यायालयाने जामीन मंजूर करताना पुन्हा गुन्हा केल्यास जामीन रद्द करण्याची अट घातली होती. हा जामीन रद्द करण्यासाठीच आपल्यावर दिशाची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचा दावाही नारायण राणे यांनी केला आहे.
राणे आणि नितेश राणे यांना ५ मार्च रोजी मालवाणी पोलीस ठाण्यात हजेरी लावली परंतु त्यांनी तपासात कोणतीही आम्हाला मदत केली नाही. आमच्याकडे असलेली माहिती आम्ही सीबीआयला देणार असल्याचे राणे पितापुत्र म्हणाले.
तसेच चौकशी संपल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना चौकशी दरम्यान फोन केला होता, असे खोटे विधान राणे यांनी केल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात सादर केली आहे.
आरोपींच्या सदरील बोलण्याचा रोख साक्षीदारांवर आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येतो. त्यामुळे तपासात अडथळे निर्माण करीत आहेत. त्यामुळे अटकपूर्व जामीन दिल्यास ते भविष्यात तपासात कोणतेही सहकार्य करणार नाहीत," असेही पोलिसांनी म्हटले आहे.