

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देण्यास मेडिकल चालकाने नकार दिल्याच्या दाेन नशेखोर तरुणांनी मेडिकलची तोडफोड केली. यानंतर त्यांनी गल्ल्यातील रोकडही लंपास केली. ही घटना कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील बल्याणी गावात असलेल्या वेलकम मेडिकलमध्ये घडली. नशेखोरांच्या तोडफोडीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
या प्रकरणी कल्याण तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गल्ल्यातून पळवलेली 12 हजारांची रोकडही हस्तगत केली आहे. सुंदरम सुरेश राऊत (वय 30) आणि शेहजाद शब्बीर शेख (25) असे अटक केलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत.
प्रकाश प्रजापती (39) यांचे बल्याणी येथे मेडिकल आहे. 3 मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सुंदरम आणि शेहजाद नशेत धुंद अवस्थेत दुकानात आले. दाेघांनी औषधची मागणी केली. मेडिकल चालक प्रजापती यांनी डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय औषध देऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. यानंतर दोघांनी मेडिकलची तोडफोड केली.
शिवाय गल्ल्यातील 12 हजार रुपयांची रोकड घेऊन हे दोघे पळून गेले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटजेच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला असता, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोघांना बल्याणी परिसरातून अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजू वंजारी यांनी दिली.