पुणे : मेट्रो उद्घाटनापेक्षा युक्रेनमधील विद्यार्थ्यांचा प्रश्न महत्त्‍वाचा : शरद पवार | पुढारी

पुणे : मेट्रो उद्घाटनापेक्षा युक्रेनमधील विद्यार्थ्यांचा प्रश्न महत्त्‍वाचा : शरद पवार

पुणे, पुढारी वृत्तसेवा : सध्या युक्रेनमधील भारतीय विदयार्थी देशात सुरक्षितपणे आणणे महत्त्‍वाचे आहे. तिकडे लक्ष देण्याऐवजी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्धवट काम पूर्ण झालेल्या मेट्रोचे उदघाटन करण्यासाठी येत आहेत. मेट्रोपेक्षा विद्यार्थी सुरक्षा अधिक महत्वाची आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले.

पुणे महानगरपालिकेतर्फे वारजे माळवाडी येथे उभारण्यात आलेल्या १०० खाटांच्या आधुनिक आणि सुसज्ज अशा कै. सुभद्रा प्रभाकर बराटे मल्टीस्पेशालिटी व मॅटर्निटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा शरद पवार यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले की, खडकवासला, वरसगाव, पानशेत अशी मोठमोठी धरणे पुण्याच्या वरच्या भागात असताना नदीचे पात्र कमी करणे, हे भविष्यातील मोठ्या दुर्घटनेचे द्योतक ठरू शकते. अतिवृष्टी किंवा ढगफुटीसारख्या घटना पुण्यात घडल्यास उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणा-या नदीसुधार प्रकल्पाचे भविष्य काय ठरू शकते ? असा सवाल पवार (Sharad Pawar) यांनी केला.

कोरोनासारख्या महाकाय संकटातून आपण नुकतेच कसेबसे बाहेर पडत असताना जगावर तिस-या महायुद्धाचे सावट घोंघावत आहे. युक्रेनमध्ये मेडीकलचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील विद्यार्थ्यांबाबत देशाच्या नेतृत्वाने अधिक तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. नवाब मलिक यांच्यावर झालेली कारवाई ही राजकीय आकसापोटी झालेली आहे. गेल्या २० वर्षांपासून नवाब मलिक प्रतिनिधीत्व करीत असताना हे प्रकरण आणि ही कारवाई पुढे येण्यामागे केवळ राजकीय आकस आहे. पंतप्रधानांनी विकासकामांची उद्घाटने करावी, परंतू आधी युक्रेनमध्ये अडकलेले निष्पाप विद्यार्थी भारतात सुखरूप येतील, यादृष्टीने कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर अभ्युदय बराटे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी महापौर प्रशांत जगताप, पुणे मनपाच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी आमदार कुमार गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक दिलीप बराटे यांनी केले. दिपाली धुमाळ यांनी आभार मानले.

हेही वाचलंत का ?

पहा व्हिडिओ

युद्ध युक्रेनमध्ये पण फोडणी महागली भारतात

Back to top button