

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या (डीसीजीआय) तज्ञ समितीने १२ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अँटी-कोविड लस कोवोव्हॅक्स ला आपत्कालीन वापर करण्यास मंजुरी दिली आहे. कोवोव्हॅक्स लसीला मंजुरी देण्यात आल्याने आता लहान मुलांच्या कोरोना लसीकरणाचा मार्ग आणखी सुकर झाला आहे.
यापूर्वी २८ डिसेंबर रोजी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) आपत्कालीन परिस्थितीत प्रौढांसाठी कोवोव्हॅक्स लसीचा मर्यादित वापर करण्यास मान्यता दिली होती. पंरतु,देशातील कोरोना लसीकरण मोहिमेत अद्याप या लसीचा समावेश करण्यात आलेला नाही. सीरम इन्स्टीट्यूटमधील सरकारी आणि नियामक प्रकरणांचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी २१ फेब्रुवारी रोजी डीसीजीआय कडे अर्ज सादर केला होता. त्यांनी देशातील १२ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोवोव्हॅक्सचा आपत्कालीन वापर करण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती.
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (सीडीएससीओ) कोरोना विषय तज्ञ समितीने नुकतीच सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या अर्जावर व्यापक चर्चा केली.याच चर्चेनंतर कोवोव्हॅक्स लसीला आपत्कालीन वापराला मंजुरी देण्याची शिफारस करण्यात आली. ही शिफारस डीसीजीआय कडे मंजुरीसाठी पाठवली जाणार आहे. या लसीमुळे देशात मुलांच्या लसीकरणाला गती मिळवून देश कोरोनाविरोधी लढण्यास सक्षम बनणार आहे. १२ ते १७ वर्षे वयोगटातील सुमारे २,७०० मुलांवरील दोन अभ्यासांतून असे दिसून आले आहे की कोवोव्हॅक्स ही लस अतिशय प्रभावी आणि सुरक्षित आहे,अशी माहिती सीरम इन्स्टिट्युटच्या वतीने देण्यात आली आहे.
हेही वाचलं का?
पाहा व्हिडीओ :