युक्रेनला भारताकडून मदतीचा हात! ६ टन मदत सामग्री पाठवली | पुढारी

युक्रेनला भारताकडून मदतीचा हात! ६ टन मदत सामग्री पाठवली

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

भारताने युक्रेनला मानवतावादी दृष्टीकोनातून मदतीचा हात दिला आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानाने हिंडन एअरबेसवरून आज सकाळी ४.०५ वाजता युक्रेनसाठी सुमारे ६ टन मदत सामग्री घेऊन रोमानियाकडे उड्डाण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका उच्चस्तरीय बैठकीत युक्रेनला मदत सामग्री पाठविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार युक्रेनला मदत पाठवली जात आहे.

याआधी राष्‍ट्रीय आपत्ती निवारण दलाने (एनडीआरएफ) युक्रेनला मदत सामग्री पाठवली होती. एनडीआरएफने युक्रेनमधल्या जनतेसाठी ब्लँकेट, स्लीपिंग मॅट्स आणि सौर लॅम्प इत्यादीसह मदत सामग्री पाठवली आहे. पोलंडला रवाना झालेल्या एका विमानामधून आणि रोमानियाला रवाना झालेल्या भारतीय हवाई दलाच्या विमानातून ही मदत सामग्री पाठवण्यात आली होती.

दरम्यान, वोल्दिमीर झेलेन्स्की हे युक्रेनचे (Russia Ukraine War) नेते असल्याचे रशियाने मान्य केले आहे. याआधी चर्चेसाठी झेलेन्स्कींनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार व्हावे आणि नवे सरकार स्थापन करावे, अशी अट घालणार्‍या रशियामध्ये झालेला हा बदल पुतीन यांनी शांततेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल असल्याचे मानले जात आहे. अर्थात, बेलारूस-पोलंड सीमेवर दोन्ही देशांदरम्यान युद्धविरामासाठी चर्चेची दुसरी फेरी होणार असतानाही इकडे युक्रेनमध्ये रशियन फौजांकडून गोळीबाराच्या फैरी झडतच होत्या.

युद्धाच्या नवव्या दिवशीही रशियन हल्ले सुरूच आहेत. कीव्ह, खार्कोव्हसह मोठ्या शहरांवर रशियाकडून क्षेपणास्त्रांचा मारा सुरूच आहे. रशियन हवाई दलाने कीव्हलगत एका रहिवासी इमारतीवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.

दरम्यान शुक्रवारी पहाटे रशियन सैन्याने शहरासाठी ऊर्जा निर्मिती करणाऱ्या न्युक्लियर पावर प्लांटला लक्ष्य केलं. रशियाच्या हल्ल्यात युरोपातील सर्वात मोठ्या न्युक्लियर पावर प्लांटला आग लागली आहे. यामुळे प्लांटमधून रेडिएशन लीक होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Back to top button