मुंबईच्या प्रवेशद्वारावर ५ लाख ५३ हजार किंमतीचा ५५ किलो गांजा जप्त Separator | Separator पुढारी

मुंबईच्या प्रवेशद्वारावर ५ लाख ५३ हजार किंमतीचा ५५ किलो गांजा जप्त

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण जंक्शनवरील पोलिसांच्या हाती 5 लाख 53 हजार रुपये किंमतीचा तब्बल 55 किलो गांज्या सापडला आहे. चोरट्या मार्गाने चरस, गांज्या, ड्रग्ज सारख्या अंमली पदार्थांची खरेदी-विक्री सुरु होते. याबाबतची माहिती एका घटनेनंतर समोर आली.

भुवनेश्वरहून मुंबईकडे जाणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या वातानुकुलीत बोगीतून 5 लाख 53 हजार रुपये किंमतीचा  55 किलो गांज्या कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांच्या हाती लागला आहे. ओरिसा राज्यातून गांज्याचा इतका मोठा साठा आणणाऱ्या सम्राट बाबूलाल पात्रा (वय 26) आणि संजू अहमद गाजी (वय 19) हे दोघेही नवी मुंबईतील नेरूळ पश्चिमेकडे असलेल्या सेक्टर – 20 परिसरातल्या बालाजी अपार्टमेंटमध्ये राहणारे आहेत. तर अजगर अली बहादुर खान (वय 29) हा कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील टिटवाळा स्टेशन मोहन हाऊस या बनेली गावातील जामा मस्जिदजवळ राहतो. या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

आरपीएफच्या जवानांच्या पथकाने दाखवलेल्या प्रसंगावधान व सतर्कतेमुळे हे तिघेही सापडले. कल्याण आरपीएफचे निरीक्षक भूपेंद्र सिंहच्या मार्गदर्शनाखाली सी. जी. रुपदे यांचे पथक बुधवारी मुंबईकडे येणाऱ्या भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनन्स या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या बोगीत इगतपुरी ते कल्याण दरम्यान पेट्रोलिंग करत होते.

दरम्यान, वातानुकुलीत बी 3 बोगीतून प्रवास करणारे तीन प्रवासी आपसात भांडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्याकडे आरपीएफच्या पथकाने विचारणा करत असताना या तिघांमधील एकाने सीट खाली असलेली बॅग आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. या तिघांच्या चेहऱ्यावरील बदललेले हावभाव पाहता त्यांच्यावरील संशय बळावला. त्यामुळेच आरपीएफच्या जवानांनी या तिघांना सामानासह ताब्यात घेत त्यांची झडती घेतली.

त्यानंतर त्यांना कल्याण रेल्वे स्थानकात उतरवून लोहमार्ग पोलिसांच्या हवाली केले. झडतीदरम्यान त्यांच्याकडे असलेल्या ट्रॉली बॅगमध्ये जवळपास 5 लाख 53 हजार 950 रुपये किमतीचा गांज्या आढळला. गांज्याचा साठा नेमका कुठून आणि कुणाला देण्यासाठी आणला ? याचा तपास करत असल्याचे  पो नि शार्दूल वाल्मिक यांनी सांगितले.

हे ही वाचलं का  

Back to top button