

CM Devendra Fadnavis Warning Majhi Ladki Bahin Yojana:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासादरम्यान आमदारांना इशारा दिला की, असंबद्ध मुद्द्यांवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा उल्लेख करू नये. विविध विषयांवर चर्चा करताना या योजनेचा वारंवार संदर्भ आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.
इशारा देताना फडणवीस म्हणाले, “हे असंच सुरू राहिलं, तर तुम्हाला घर बसण्याची वेळ येईल.” त्यांच्या या वक्तव्याने सभागृह काही काळ शांत झालं होतं. यानंतर भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी कथित अवैध दारू वितरणाचा मुद्दा मांडताना योजनेचा उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ त्यांना थांबवत पुन्हा इशारा दिला. विशेष म्हणजे, पवार हे काही काळ फडणवीसांचे खास सहायक म्हणूनही काम करत होते.
फडणवीस म्हणाले, “मी आधीच स्पष्ट सांगितले आहे, असंबद्ध विषयांत ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा उल्लेख करू नका. हे सर्व सदस्यांवर समानपणे लागू आहे.” काँग्रेसच्या ज्योती गायकवाड यांनी योजनेचा अनावश्यक संदर्भ दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे स्पष्ट केले की, ही योजना राज्याची महत्त्वाची कल्याणकारी योजना असून त्यावर राजकीय वाद किंवा असंबद्ध चर्चा करणे योग्य नाही. ते म्हणाले,
“ही योजना सुरू राहील. इतर कोणत्याही योजनेचा निधी यासाठी वळवला जाणार नाही. परंतु अनावश्यक टीका किंवा चर्चा टाळा.”
मुख्यमंत्र्यांच्या या कडक भूमिकेनंतर प्रश्नोत्तरांचा उर्वरित कालावधी शांततेत पार पडला. कोणत्याही आमदाराने पुन्हा या योजनेचा उल्लेख केला नाही. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या सर्वांत महत्त्वाच्या योजनांपैकी ही एक योजना मानली जाते.