सोलापूर जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचे भक्तीमय वातावरणात स्वागत

सोलापूर जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचे भक्तीमय वातावरणात स्वागत
Published on
Updated on

माळशिरस : पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आळंदीतून निघालेल्या संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे हरी नामाच्या गजरात आज (दि.४) सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथील धर्मपुरी बंगला येथे आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून पालखीचे स्वागत केले.

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्वागत समारंभास माजी आमदार रामहरी रूपनवर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, तहसिलदार जगदिश निंबाळकर, गट विकास अधिकारी विनायक गुळवे, सरपंच अमोल पाटील आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, माऊलीच्या पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

माऊलींच्या पालखीचे आगमन सकाळी 11.30.च्या सुमारास धर्मपुरी बंगला येथे झाले. तत्पूर्वी, सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा, अप्पर पोलीस अधीक्षक अजय बोराडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांनी माऊलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला.

चला पंढरीसी जाऊं। रखमुमादेविवरा पाहू॥
डोळे निवतील कान। मना तेथे समाधान ॥
संतां महंता होतील भेटी। आनंदे नाचो वाळवंटी॥

या संत तुकाराम महाराज अंभगाने हरिनामाच्या गजरात पालखीचा जिल्हा प्रवेश झाला. पालखी अगमनापूर्वी आयोजित कार्यक्रमात धर्मपुरी येथे आरोग्य विभागाने कला पथकाव्दारे आरोग्य विषयक विविध योजनांची वारकर्‍यांमध्ये जागृती करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आले. वारीमधील महिला वारकर्‍यांसाठी माफक दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध व्हावे, म्हणून वेंडर मशीन विसावा ठिकाणी बसविली आहे. त्याप्रमाणेच आरोग्य विभागाने वारीमध्ये प्रथमच स्तनदा मातासाठी हिरकणी कक्ष सेवा उपलब्ध करून दिली आहे.

यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगेश देसाई, पालखी सोहळा प्रमुख अ‍ॅड. विकास ढगे तसेच बाळासाहेब चोपदार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आषाढी यात्रा 2022 या सोलापूर जिल्हा माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनातील सर्व मान्यवर अधिकार्‍यांनी टाळ हाती धरुन हरी नामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर विसाव्यापर्यंत पायी चालले.

पालखी सोहळा नातेपुते मुक्कामी

कांरुडे येथे विसावा घेऊन माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी नातेपुतेकडे रवाना झाली. पालखी सोहळ्याबरोबर येणार्‍या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे, आरोग्य सुविधा, स्वच्छता, सुरक्षा तसेच विद्युत पुरवठा आदी आवश्यक सुविधा जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news