

पोलादपूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात आज सकाळपासूनच सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कशेडी घाटातील चोळई येथे दरड कोसळली. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत येथील २० कुटुंबातील ७५ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यांची राहण्याची सोय विद्या मंदिर पोलादपूर येथे करण्यात आली आहे.
या ठिकाणी चौपदरीकरण कामामुळे डोंगराचा काही भाग कापण्यात आला आहे. त्यामुळे पावसामुळे दरडी कोसळत आहेत. या ठिकाणी दगड माती खाली कोसळत असल्याने गावाला धोका निर्माण झाला आहे. तालुका प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. यावेळी नायब तहसीलदार समीर देसाई, पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, नरवीर रेस्क्यू टीमचे पदाधिकारी रामदास कळंबे, दीपक उतेकर यासह आपत्ती निवारण कक्षाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस उपस्थित होते.
हेही वाचलंत का ?