

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात बार्शी शहरातील एका युवकाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी एसपी कार्यालय परिसरातील पोलिसांनी त्याला पकडून ताब्यात घेतले. आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेल्या युवकाचे नाव अमर पुरवले असे आहे. ही घटना बुधवारी (दि.१५) रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बार्शी शहरातील शिवशक्ती अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये संचालक मंडळाने अमर पुरवले यांच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून २५ लाखांचे कर्ज काढले होते. ही माहिती पुरवले यांना समजल्यावर त्यांनी पोलिसात तक्रार केली. मात्र, बार्शी शहर पोलिसांनी याची दखल घेतली नाही.
यानंतर त्यांने पोलीस अधिक्षक कार्यालयात जावून चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. मात्र, तेथेही कोणतीही कार्यवाही झाली नाही. शेवटी पुरवलेने आत्मदहन करण्याचा इशारा पोलिस अधीक्षकांना दिला होता. याप्रमाणे बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांने पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या आवारात येवून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया हे गुरुवारी (दि.१६) आणि शुक्रवारी (दि.१७) रोजी सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी सोलापूरमध्ये आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक लोहिया यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुरवले यांनी पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या आवारात स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
हेही वाचलंत का?