पुण्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यात पोलिस बऱ्यापैकी यशस्वी | पुढारी

पुण्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यात पोलिस बऱ्यापैकी यशस्वी

पुणेकरांच्या अनेक जिव्हाळ्याच्या विषयांबाबत पुढील वर्षी नेमकं काय हवं, याची मांडणी वर्षारंभी दैनिक ‘पुढारी’नं ‘अजेंडा पुणेकरांचा’ या मालिकेत मांडली. आता वर्ष सरत असताना हा अजेंडा प्रत्यक्षात किती उतरला, याचा लेखाजोखा आजपासून मांडत आहोत.                                                                                                                                – निवासी संपादक

Ajenda Logo
Ajenda Logo

पुणे : अशोक मोराळे : सरत्या वर्षाच्या सुरुवातीला गुन्हेगारी डोके वर काढत असताना, पोलिस यंत्रणा राबवित असलेल्या विविध उपाययोजनांमुळे पुण्याला अशांत करून पाहत असलेल्यांचा बंदोबस्त करण्यात बहुतांश प्रमाणात पोलिसांना यश आल्याचे दिसते आहे. ग्रामीण पोलिस दलातील दोन पोलिस ठाणी शहरात आली असून, नव्याने होणार्‍या पोलिस ठाण्यांची प्रक्रिया मात्र सुरूच आहे. सायबर गुन्हेगारीचा वाढता आवाका पाहता आयुक्तांनी सायबर पोलिस ठाण्याची नव्याने पुनर्रचना करून कुशल मनुष्यबळ देण्यास प्राधान्य दिले आहे. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मात्र कायम असून, ठोस उपाययोजनांची गरज असल्याचे दिसते. सर्व प्रकारच्या चोरींच्या घटना कशा रोखता येतील आणि अशा गुन्ह्यांची उकल गतीने कशी करता येईल, याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. दैनिक ‘पुढारी’ने गतवर्षी 2021 चा पुणे शहराचा कायदा व सुव्यवस्थेचा अजेंडा मांडत असताना, चालू वर्षात पोलिसांनी कोणत्या गोष्टीवर काम करणे अपेक्षित आहे, याचा लेखाजोखा मांडला होता. त्यात पोलिस कशापद्धतीने यशस्वी झाले याचा हा उहापोह….

वाहतूक विभागाला आणखी बुस्टची गरज

पुण्याच्या काही प्रमुख समस्यांपैकी वाहतूक कोंडी ही एक प्रमुख समस्या आहे. सायकलींच्या शहरानंतर आता दुचाकींचे शहर म्हणून पुणे ओळखले जाते. अंतर्गत प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी वाहनांचा उपयोग केला जातो. अशातच ठिकठिकाणी सुरू असलेली मेट्रोची कामे. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे. सध्या वाहतूक विभागाकडे 973 कर्मचारी व 70 ते 80 अधिकारी असे मिळून एक हजारपेक्षा अधिक मनुष्यबळ आहे. 40 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात वाहतूक विभागाचे मनुष्यबळ अगदी तोकडे आहे. त्यामुळे वाहतूक विभागापुढील आव्हान कायम असणार आहे. त्याचबरोबर सिग्नल यंत्रणा अपडेट करणे, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे जाळे मोठे करणे गरजेचे ठरणार आहे. सध्याचे मनुष्यबळ व शहराची लोकसंख्या पाहता आणखी 40 टक्के मनुष्यबळाची वाहतूक विभागाला गरज आहे.

म्हाडा पेपरफुटी प्रकरण : उत्तरपत्रिका कोरी ठेवण्याचा सल्ला

पोलिस आयुक्तांकडून ‘भरोसा’ कायम

सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेतली जावी, तसेच त्यांच्या तक्रारीचा पाठपुरावा व्हावा, म्हणून तत्कालीन पोलिस आयुक्तांनी सुरू केलेल्या ’भरोसा’ या उपक्रमाला गती देऊन पोलिस आयुक्त गुप्ता यांनी पोलिसांवरील भरोसा आणखी दृढ केला आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाला ताकद

तत्कालीन पोलिस आयुक्तांनी सामाजिक सुरक्षा विभागाला केवळ नामधारी करून ठेवत इतर कामांची धुरा त्यांच्या खांद्यावर दिली होती. मात्र, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या पथकाला ताकद दिली आहे. पूर्णवेळ अधिकार्‍याची नेमणूक जरी येथे करण्यात आली नसली, तरी तात्पुरता पदभार हाती देऊन हा विभाग सुरू आहे. सामाजिक सुरक्षा विभागाकडून शहरात विविध प्रकारच्या कारवाया करण्यात येतात. चालू वर्षात त्यांनी अनेक उल्लेखनीय कामगिरी केल्या आहेत. मात्र, ज्या हेतूसाठी या विभागाची निर्मिती करण्यात आली, तो हेतू काहीसा दूर पडल्याचेही आढळून येते आहे.

पुणे : पैशांसाठी एकाच कुटुंबातील चार जणांचा निर्घृण खून करणार्‍यास फाशी 

घरफोड्या रोखण्याचे आव्हान कायम

एकीकडे मोठ्या गुन्ह्यांच्या तपासात पोलिस कसब दाखवत असताना, दुसरीकडे मात्र घरफोड्या किरकोळ आणि जबरी चोर्‍यांचे गुन्हे रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर ’जैसे थे’ असल्याचे दिसून येते. अशा गुन्ह्यांमुळे शहराचा गुन्हेगारी आलेख उंचावत आहे. हे गुन्हे जरी दुय्यम वाटत असले, तरी यावर ठोस उपाययोजना केल्या, तरच गुन्हेगारीचा आलेख मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. मागील वर्षी सर्व प्रकारच्या चोर्‍यांचे प्रमाण 2100 होते. त्यात या वर्षी लक्षणीय वाढ झाली असून, हा आकडा 2 हजार 980 च्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे या चोर्‍या रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची खरी गरज आहे.

पर्यावरणसंबंधित खटल्यांत पुणे न्यायपीठ देशात मागे

दरोडा प्रतिबंधक पथके ढेपाळलेलीच

गुन्हे शाखेची नव्याने पुनर्रचना करीत वाहनचोरी व दरोडा प्रतिबंधक अशा दोन पथकांची निर्मिती करण्यात आली. मात्र, वर्षाचा कालावधी लोटला, तरी त्यांचा जेवढा प्रभाव दिसायला हवा, तो दिसून येत नाही. आगामी वर्षात वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्याचे काम या दोन्ही पथकांकडून होणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्याकडून तसे होऊ शकले नाही. शहरातून चोरी जाणार्‍या वाहनांची संख्या मोठी आहे.

ग्रामीणमधील दोन पोलिस ठाणी शहरात

नव्याने होणार्‍या पोलिस ठाण्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम प्रगतिपथावर असून, ग्रामीण पोलिस दलातील लोणी काळभोर व लोणीकंद ही दोन पोलिस ठाणी पुणे पोलिस आयुक्तालयात समाविष्ट झाली आहेत. या दोन्ही ठाण्यांना बुस्ट देण्याचेदेखील काम सुरू आहे. वाघोली, फुरसुंगी, खराडी, काळेपडळ, बाणेर अशा सहा पोलिस ठाण्यांना ग्रीन सिग्नल मिळाला असला, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीची सुरुवात होणे बाकी आहे. त्याचा सर्व स्तरांवर पाठपुरावा होण्याची गरज आहे.

पुणे जिल्ह्यात पाच नवीन पोलिस ठाणी : एक उपविभाग

सायबर पोलिस ठाण्याची पुनर्रचना

शहरातील वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच तपासात सुसूत्रता निर्माण करून गुन्ह्यांचा कमी वेळात छडा लावण्यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सायबर पोलिस ठाण्याची नव्याने पुनर्रचना केली. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचा कमी वेळात निपटारा करण्याबरोबरच पोलिसांचा वेळ आणि श्रमाची बचत होण्यासदेखील मदत झाली. गुप्तांनी पदभार घेतल्यानंतर पोलिस दलात केलेल्या बदलांपैकी सायबर पोलिस ठाण्याचा हा एक प्रमुख बदल असल्याचे दिसून येते.

मनसेच्या रूपाली पाटील राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत?

पुढील कालावधीत सायबर गुन्हेगारी रोखणे हे शहर पोलिस दलासमोरील प्रमुख आव्हान असेल. त्यामुळे प्रशिक्षित मनुष्यबळ वाढविण्याबरोबरच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर पोलिसांनी करणे गरजेचे आहे, आणखी एका सायबर पोलिस ठाण्याची गरज भविष्यात भासू शकते, असे मुद्दे मागील वर्षी उपस्थित केले होते. या वर्षभरात गुन्ह्याच्या स्वरूपानुसार सायबर पोलिस ठाण्यात 5 युनिटची निर्मिती करण्यात आली आहे. गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार त्या त्या युनिटकडे संबंधित गुन्हे तपासासाठी दिले जात आहेत. पूर्वी एकाच तपास अधिकार्‍याकडे विविध प्रकारचे गुन्हे तपासासाठी दिले जात होते. त्यामुळे वेळ आणि श्रमाचा अपव्यय होताना दिसत होता. त्याचबरोबर प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळ पुरविण्यात येते आहे.

‘भूमीअभिलेख’च्या परीक्षा होणारच; टोळक्यांची फसवेगिरी केली ‘लॉक’

2021 मधील पोलिस आयुक्तांची ठोस कामे

 • कुख्यात गुंडांच्या 64 टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई
 • 50 गुंडांना स्थानबद्ध करून कारागृहात पाठविले
 • तडीपारीच्या कारवाईचा आलेख चढताच
 • सायबर पोलिस ठाण्याची पुनर्रचना
 • पोलिस मुख्यालयाचा कायापालट
 • गुटख्यापासून ते पेपरफुटीच्या मुळावर घाव
 • क्रिकेट बेटिंग ते अवैध सावकारीचा बंदोबस्त
 • बालकांसाठी नवीन सहा चाइल्ड फ्रेंडली पोलिस ठाणी
 • पोलिस कर्मचारी अधिकार्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी समाधान हेल्पलाइन
 • पोलिसांचा वावर वाढण्यासाठी ’माय सेफ’ पुणे संकल्पना, पोलिसांच्या फिटनेसवाढीसाठी सायकल पेट्रोलिंग
 • सामाजिक माध्यमातून नागरिकांशी संवाद
 • अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना, दीर्घकालीन महिला सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनांना गती
 • पोलिसांमध्ये तपासाबाबत स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून ’बहिर्जी नाईक पुरस्कार’
 • अमली नशाखोरी रोखण्यासाठी दूरगामी उपायोजना

Leena Nair : अभिमानास्पद! कोल्हापूरच्या लीना बनल्या फ्रान्स लग्झरी ग्रुप Chanel च्या सीईओ

Back to top button