ताडोबाच्या बफर- कोअर झोनमध्ये आज रात्री वन्यप्राणी गणना! | पुढारी

ताडोबाच्या बफर- कोअर झोनमध्ये आज रात्री वन्यप्राणी गणना!

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : बुध्द पौर्णिच्या रात्री म्हणजे, आज २३ मेला लखलत्या चंद्रप्रकाशात ताडोबातील बफर व कोअर झोनमध्ये वन्यप्राणी गणना होणार आहे. दोन्ही झोनमध्ये वनविभागाने तयारी पूर्ण केली असून पर्यटक व अधिकारी सज्ज झाले आहेत. बफरमध्ये ७९ मचाणीवरून १६० पर्यटक प्राणी गणना निसर्गानुभव घेणार आहेत. तर कोअरमध्ये अधिकारी स्वत:च प्राणी गणना करणार असल्याची माहिती ताडोबाच्या सुत्रांनी दिली आहे.

बुध्द पौर्णिमेला रात्री चंद्र हा पूर्ण निघतो. लख्ख स्पष्ट प्रकाश देतो. या प्रकाशात वन्यप्राण्यांच्या हालचाली स्पष्टपणे दिसतात. त्यामुळे परंपरागत काळापासून वन्यप्राणी गणनेची चाललेली गणना बुध्द पौर्णिमेच्या रात्री न चुकता केली जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प देशभरात व्याघ्र दर्शनासाठी प्रसिध्द असे ठिकाण आहे. आज गुरूवारी (दि. २३ मे) ला सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ताडोबातील बफर व कोअर झोनमध्ये प्राणी गणना पार पडणार आहे.

बुध्द पौर्णिमेच्या रात्री होणारी वन्यप्राणी गणना हा एक निसर्गानुभवाचा कार्यक्रम आहे. बफर झोनमध्ये वन्यप्राणी गणना ही निसर्ग, पर्यटनप्रेमी किंवा अशासकीय संस्था यांचे माध्यमातून केली जाते. या निसर्गानुभवासाठी ऑनलाईन व ऑफलाईन प्रवेश देण्यात आले. त्यामध्ये २९५ पर्यटनप्रेमींनी बुकींग केली असून त्यापैकी १६० पर्यटनप्रेमींना प्रत्यक्ष प्राणी गणनेची संधी मिळाली आहे. ही प्राणी गणना पाणवट्याजवळ किंवा पाण्याच्या ठिकाणी केली जाते.

बफरझोनमध्ये ७९ मचानी उभारण्यात आल्या आहेत. मचानी या लोखंडी तयार करण्यात आलेल्या आहेत. एका मचानीवर दोन व्यक्ती बसून त्यामध्ये एक पर्यटनप्रेमी व एक वनविभागाचे गाईड राहतील. प्रगणनेसाठी आवश्यक साहित्य वनविभागाचे वतीने पुरविले आहे.

ताडोबातील बफर झोनमध्ये मोहूर्ली, मुल, चंद्रपूर, शिवणी, पळसगाव व खडसंगी आदी ६ रेंजमध्ये ही प्रगणना होईल. आज गुरूवारी सायंकाळी ६ वाजता गणना सुरू होईल. उद्या शुक्रवारी सकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल १२ तास ही प्रगणना चालेल. त्यानंतर निसर्गप्रेमींना त्या ठिकाणावरून परत जावे लागेल. तत्पूर्वी या ठिकाणी १६ प्रवेशद्वारावरून निसर्गानुभवाचा आनंद घेणाऱ्या १६० पर्यटनप्रेमींना वनविभाग आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत गणना होणाऱ्या मचाणीच्या ठिकाणापर्यंत पोहचविणार आहे.

बुध्द पौर्णिमेच्या रात्री होणारी वन्यप्राण्यांच्या गणनेतील माहिती फक्त डाटा सकंलन म्हणून करण्यात येते, त्या माहितीच्या आधारे वन्यप्राण्यांची आकडेवारी घोषीत केली जाते अशी माहिती ताडोबा प्रशासनाने दिली आहे. गणना करणाऱ्या निसर्गप्रेमींच्या सुरक्षेसाठी वनाधिकारी उपस्थित राहतील. निसर्गप्रेमींना भोजन व अन्य सुविधा स्वत: करावी लागणार आहे.

कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत. चंद्रपूरचा पारा ४२ अंशापार गेला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची भटकंती पाणी पिण्यासाठी पाणवट्याकडे होणार असून निसर्गप्रेमींना हा अनुभव ‘याची डोळा याची देही’ पाहता येणार आहे. पाणवट्याशिवाय नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतांकडेही वन्यप्राणी भटकंती करणार असल्याने पर्यटनप्रेमींना रात्रभर जागून निसर्गानुभवाचा आनंद घेऊन वन्यप्राण्यांची गणना करण्याची संधी मिळाली आहे. या निसर्गानुभवाचा खरा उदेश्य म्हणजे, वन्यप्राण्यांबद्दल आत्मीयता निर्माण करणे, वन्यप्राण्यांबाबत जनजागृती करणे हा आहे.

ताडोबातील कोअर झोन हा अतीसंवेदनशील भाग आहे. त्यामुळे कोअर झोनमध्ये वन्यप्राण्यांची गणना ही ताडोबातील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी स्वत: करणार आहे. यासाठी कोअर झोन मध्येही मचानी उभारण्यात आल्या बसून अधिकारी कर्मचारी सज्ज झाले आहेत. दोन्ही झोनमध्ये एकाच वेळी आज सायंकाळी ६ ते उद्या सकाळी ६ वाजतापासून वन्यप्राण्यांची गणना होईल.

हेही वाचा 

Back to top button