सोलापूर : पतीकडून पत्‍नी आणि मुलीचा निर्घृण खून; नंतर पलायन | पुढारी

सोलापूर : पतीकडून पत्‍नी आणि मुलीचा निर्घृण खून; नंतर पलायन

करमाळा (सोलापूर) : पुढारी वृत्‍तसेवा

अज्ञात कारणाने पतीने पत्नी व मुलीचा डोक्यात घाव घालून निर्घृण खून केला. यानंतर त्‍याने पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला. लक्ष्मी अण्णा माने (वय 30 वर्ष) व श्रुती अण्णा माने (वय 12 वर्षे) दोघेही रा. भिलारवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर असे खून झालेल्या आई व मुलीचे नाव आहे. अण्णा भास्कर माने (रा. भिलारवाडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर) असे संशयित आरोपींचे नाव आहे. निर्घुण खूनाच्या घटनेमुळे करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात खळबळ उडाली आहे.

या घटनेची फिर्याद कमलेश गोपाळ चोपडे (वय 30, रा. देवळाली, ता. करमाळा, जि. सोलापूर) याने करमाळा पोलिसांत दिली आहे. हा प्रकार सोमवार दि. 08/11/2021 सकाळी 09/45 वाजण्याच्या सुमारास मौजे भिलारवाडी येथील मृताच्या राहत्‍या घरात उघडकीस आला आहे.

पहाटेच्या सुमारास संशयित माने मोटारसायकलवरून निघून गेला

याबाबतची अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी आण्णा माने, मयत लक्ष्मी माने व श्रृती माने, मुलगा रोहित माने व मृताची सासू हे एकत्रित भिलारवाडी येथे राहण्यास आहेत. दोन्ही मृत व संशयित आरोपी आण्णा हे एका खोलीत तर मुलगा रोहित हा आजी सोबत दुस-या खोलीत झोपले होते. दरम्यानस, पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास संशयित आण्णा माने हा मोटारसायकलवरून निघून गेल्याचे मुलगा रोहित माने याने पाहिले होते. त्यानंतर सकाळी लक्ष्मी व श्रृती या दोघी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आल्याने हा खुनाचा प्रकार उघडकीस आला.

मानेच्या तपासासाठी तीन पथके

त्यामुळे आण्णा माने यानेच अज्ञात हत्याराने अज्ञात कारणाने दोघींच्या डोक्यात मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारल्‍याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानुसार मृत लक्ष्मीचा भाऊ कमलेश चोपडे यांनी संशयित आरोपी आण्णा मानेच्या विरोधात दोन खून केल्याची फिर्याद दिली आहे. याबाबत करमाळा पोलिसांनी संशयित आरोपी आण्णा माने याच्या तपासासाठी तीन पथके पाठवली आहेत. अद्याप आण्णा माने हा फरार झाला असून, त्‍याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर हे करीत आहेत.

Back to top button