दिवाळी अंकाचे उत्तरायण | पुढारी

दिवाळी अंकाचे उत्तरायण

संपादक : हॅलो, सर मी बोलतोय. आवाज ओळखलात का?
लेखक : नाही. आवाजावरून माणसे ओळखण्याची विद्या नाही माझ्याकडे.
संपादक : (हसत) अहो, मी उपेक्षा दिवाळी अंकाचा संपादक बोलतोय.
लेखक : आता लक्षात आलं. तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा! बोला काय म्हणताय?
संपादक : अंक मिळाला का आणि कसा वाटला?
लेखक : सगळ्या उपेक्षित लेखकांचे साहित्य घेऊन तुम्ही छान अंक काढला आहे.
संपादक : उपेक्षित लेखकांच्या साहित्याचा समावेश असलेला हा अंक तुम्हाला अपेक्षित असा झाला आहे का?
लेखक : छान कोटी केलीत. अंकाची सजावटही छान आहे. मुख्य म्हणजे कोरोनाचे संकट असूनही तुम्ही खूप जाहिराती मिळविल्या. मानलं तुम्हाला! असा पाहिजे संपादक.
संपादक : धन्यवाद सर. खूप धडपड करावी लागते, तेव्हा कुठे जाहिराती मिळतात.
लेखक : तुम्हाला जाहिरातीसाठी धडपड करावी लागते आणि आम्हाला लेखनासाठीचा विषय शोधण्यासाठी धडपड करावी लागते.
संपादक : या जगात कष्टाशिवाय काहीही मिळत नाही.
लेखक : अगदी खरंय. संपादकांकडून मानधन मिळविण्यासाठीही खूप कष्ट करावे लागतात. तुम्ही पाठविलेला दिवाळी अंक मिळाला. लेखकाचे मानधन कधी पाठवणार आहात?
संपादक : पाठविणार की!
लेखक : गेली पंधरा वर्षे तुमच्या दिवाळी अंकात लिहितोय. दरवर्षी तुमचे हेच उत्तर आहे. तुमच्या उपेक्षा या दिवाळी अंकात लिहिता लिहिता माझा उपेक्षित लेखक ते प्रतिष्ठित लेखक असा प्रवास झाला; पण मानधनाच्या बाबतीत मात्र उपेक्षाच झाली.
संपादक : (हसत) सर, दिवाळी अंकाची संस्कृती टिकावी म्हणून आम्ही हे उद्योग करतोय. पोटाला चिमटा घेऊन.
लेखक : पोटाला चिमटा घेऊन तुमचं पोट सुटलं आहे. थोडं लेखकाच्याही पोटात जाऊ द्या.
संपादक : सर, फराळाचा कार्यक्रम ठेवला आहे आपण लेखकांसाठी.
लेखक : आमच्या घरी या. मीच फराळ देतो तुम्हाला. दिवाळी झाली असली तरी आमच्याकडे फराळाचे पदार्थ शिल्लक आहेत अजून. मानधनाचं बोला.
संपादक : जाहिरातीची बिलं वसूल झाली की देतो मानधन.
लेखक : ती कधी वसूल होणार?
संपादक : होतील पुढच्या दिवाळीपर्यंत. ती वसूल झाली की मानधन देतो; पण पुढच्या अंकासाठी तुमचा लेख हवाच बरं का?

– झटका

संबंधित बातम्या
Back to top button