Ganesh Chaturthi 2023 | उद्या गणेश चतुर्थी, जाणून घ्या मंगलमूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त | पुढारी

Ganesh Chaturthi 2023 | उद्या गणेश चतुर्थी, जाणून घ्या मंगलमूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त

पंचांगकर्ते ओंकार मोहन दाते, सोलापूर

आबालवृद्धांच्या उत्साहाला उधाण आणणाऱ्या गणेश चतुर्थी उत्सवाला उद्या (दि.१९) सुरुवात होत आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी पार्थिव श्रीगणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही. प्रात:कालापासून मध्याह्नापर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजा करता येते. त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विष्टिकरण, इ. वर्ज्य नाहीत, म्हणून ते पाहू नयेत. म्हणून यावर्षी १९ सप्टेंबर रोजी भद्रा व वैधृति योग असला तरीही नेहमीप्रमाणे ब्राह्म मुहूर्तापासून (पहाटे पासून) मध्याह्नापर्यंत म्हणजे सुमारे पहाटे ४:५० पासून दुपारी १:५० पर्यंत कधीही आपल्या घरात गणेशाची स्थापना करता येईल. (Ganesh Chaturthi 2023)

संबंधित बातम्या

गणपतीची मूर्ती साधारणतः ८ – १६ दिवस आधी आणू घरामध्ये ठेवता येते. श्रीगणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्याच दिवशी सकाळी मूर्ती आणावयास पाहिजे असे नाही. पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्याने त्या दिवशी जमले नाही तर पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येत नाही. एखाद्या वर्षी काही कारणाने लोप झाल्यास पुन्हा पुढील वर्षी गणपती पूजन करता येते.

घरामध्ये गर्भवती स्त्री असतानाही गणपती विसर्जन करावे. अशा वेळेस विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे. ही प्राणप्रतिष्ठा करून बसविलेली मूर्ती उत्तरपूजा करून देव्हार्‍यातून खाली काढतात व तिचे पाण्यात विसर्जन करतात. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये, तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी. प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा तत्सम पाण्यात न विरघळणार्‍या पदार्थांची मूर्ती नसावी. (Ganesh Chaturthi 2023)

गौरी (महालक्ष्मी) पूजन

भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करून ज्येष्ठा नक्षत्राचे दिवशी गौरी पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. अनेकांकडे गौरीपुढे नैवेद्य दाखवून ता दिवसभर ठेवून दुसर्‍या दिवशी खाण्याची प्रथा आहे, पण ताट तसेच ठेवून दुसर्‍या दिवशी प्रसाद घेणे योग्य वाटत नाही. कारण कोणत्याही देवतेला नैवेद्य समर्पण केल्याबरोबर त्या देवतेने नैवेद्य स्वीकारलेलाच असतो आणि त्यानंतर लगेच प्रसाद म्हणून तो आपण घेऊ शकतो.

यंदाचे गणेशोत्सवातील महत्त्वाचे दिवस (ganesh chaturthi 2023 start and end date)

– १९ सप्टेंबर २०२३, मंगळवार – श्रीगणेश चतुर्थी
(पहाटे ४:५० पासून दपारी १:५० पर्यंत कधीही घरात गणेशाची स्थापना करता येईल.)

– २१ सप्टेंबर २०२३, गुरुवार – गौरी आवाहन
(सूर्योदयापासून दपारी ३:३५ पर्यंत अनुराधा नक्षत्रावर आपल्या परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे.)

– २२ सप्टेंबर २०२३, शुक्रवार – गौरी पूजन

– २३ सप्टेंबर २०२३, शनिवार – गौरी विसर्जन
(सूर्योदयापासून दपारी २:५६ पर्यंत मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करावे.)

– २८ सप्टेंबर २०२३, गुरुवार – अनंत चतुर्दशी
(अधिक माहितीस्तव – पुढील वर्षी श्री गणेशाचे आगमन १२ दिवस लवकर म्हणजे ७ सप्टेंबर २०२४ रोजी शनिवारी होणार आहे.)

 हे ही वाचा 

Back to top button