सदगुरू जग्गी वासुदेव
हजारो वर्षांपासून गणेश चतुर्थी चालत आलेली असून, गणपती हा भारतातील सर्वात लोकप्रिय आणि विदेशात सर्वाधिक पोहोचलेला देव आहे. गणेशाने ह्या देशातील सर्व ज्ञान आत्मसात केलेले आहे. त्याची विद्वत्ता व बुद्धिमत्ता मानवी क्षमते पलीकडील होती. विद्वत्ता अधोरेखित करण्यासाठी गणपतीला नेहमी लेखणी व वही सोबत दाखवले जाते. अगदी आजही एखाद्या मुलाच्या शिक्षणाची सुरवात करण्याआधी गणपतीला आवाहन केले जाते.
गणेश चतुर्थीचे ( Ganesh Chaturthi ) महत्त्व म्हणजे आपणच देवाला निर्माण करतो आणि नंतर त्याला पाण्यामध्ये विसर्जित करतो. भारतीय संस्कृती सोडून इतरत्र कोठेही हे शक्य नाही; कारण आपण हे जाणतो की, आपण काही काळाकरता देव निर्माण करतो, त्या काळात काही गुण आत्मसात करतो आणि नंतर आपण देवाला विसर्जित करतो. या संस्कृतीत त्याला मान्यता दिली गेली आहे. म्हणूनच हे जबाबदारीने व्हायला हवे.
ईश्वराला बनविण्याचा आणि विसर्जित करण्याचा हा जो अधिकार आपल्याला मिळालेला आहे तो कायम राहायचा असेल; तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणाच्या कायद्यांनी मूलभूत सांस्कृतिक बाबींवर बंधने आणण्याआधीच आपण गणपतीला पर्यावरणपूरक शक्ती बनविले पाहिजे. माती, तांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ, हळद, अशा नैसर्गिक व सेंद्रिय घटकांपासूनच गणपतीची मूर्ती बनविली पाहिजे – आणि ती सुंदर पण दिसेल!
गणेश मूर्ती बनविण्यासाठी प्लास्टीक वापरणे, विविध प्रक्रिया करताना मूर्ती भाजणे, प्लास्टिक पेंटचा वापर करणे यामुळे ती मूर्ती पाण्यात विरघळणार नाही. शिवाय त्यामुळे होण्याऱ्या प्रदूषणामुळे आपले व परिसरातील प्रत्येकाचे आरोग्य धोक्यात येईल. गणपती रंगीत असला पाहिजे असे जर तुम्हाला वाटत असेल तर वनस्पतींपासून बनलेले रंग वापरावेत. त्यामुळे गणपतीची मूर्ती सुंदर व आकर्षक दिसेलच शिवाय पर्यावरणपूरकही राहील. चला, हे घडवून आणूया. कारण या संस्कृतीच्या जतनासाठी आणि गणपतीचा महिमा कायम राखण्यासाठी हे आवश्यक आहे.